जंगल
पण, जंगल हे एक पुस्तक आहे. ज्यामध्ये एक वेगळेच जग आहे. असे पुस्तक की, ज्यात लपलेल्या आहे काही रहस्यमय गोष्टी! जंगल हे सातत्याने बदलत राहाते. जंगलात आपण जरी एकाच ठिकाणी नेहमी जात राहिलो, तरी ती जागा आपल्याला दरवेळेला बदललेली दिसेल. या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाची जी आगळी-वेगळी लिपी आहे ती कोण्या एखाद्या मार्गदर्शकाशिवाय फारच क्वचित लोकांना कळते.
हजारो वर्षांआधी माणूस आणि प्राणी यामध्ये फार साम्य होते. पण, कालांतराने माणसाला तीन गरजेव्यतिरिक्त चौथी गरज भासू लागली ती म्हणजे, ‘पैसा.’
नंतर त्याने स्वत:च असे वेगळे जग बसवले. तिथे तो आपल्या मनाचा ‘राजा’ होता. तो सोबत असे प्राणी ठेवायला लागला जे त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागतील. त्याच्या समोर मान खाली करून उभे राहातील.
आणि त्या मुक्या प्राण्यांना तो राब-राब राबवतो. जर त्या मुक्या श्वापदाने थोडी जरी चूक केली तर त्याला सुद्धा तेवढेच गुन्हेगार समजल्या जायचे जेवढे एका माणसाला समजल्या जात असे.
मनुष्याची प्रगती आता आकाशाला जाऊन भिडली. तो निरनिराळे कारखाने काढू लागला. पण, त्यातील प्रदूषित पाणी व धूर तो शहराबाहेरील जंगलात सोडतो. त्याचे कारण म्हणजे शहर प्रदूषित नाही झाले पाहिजे? पण, जंगलाचे काय? माणूस प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करू शकतो. पण, वन्यजीव व वृक्षांचे काय? ते कसे जगतील?
मी एकदा माझ्या गावाजवळील ‘वाई’च्या जंगलात गेलो. ‘वाई’ या गावाभोवताली असणार्या त्या जंगलाला आम्ही ‘वाई’चे जंगल म्हणून ओळखतो. जाण्याआधी त्या जंगलाविषयी बरीचशी माहिती गोळा केली.
गावातील काही मंडळी या जंगलाला ‘भूलभुलैया’चे जंगल म्हणून ओळखतात. कारण, त्या जंगलात गावातील पुष्कळशी माणसं हरवली होती. त्या जंगलाचे अनुभव ऐकताना त्या अनुभवणार्या व्यक्तीच्या चेहर्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. त्यामुळे आमच्या तिघांचीही उत्सुकता शिगेला टेकली होती आणि निघायचा तो दिवस उगवला. आम्ही तिघे (शुभम, चेतन, मी) गाडीने वाईच्या मार्गावर चालू लागलो. त्या रस्त्याने फारच शुकशुकाट होता. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या झोपडीपासून डाव्या हातावरून जंगलात जाणार्या त्या वाटेवर उतरायचे होते आणि रस्त्याने सुद्धा आमचा साथ सोडला.
काही ठिकाणी ते जंगल एवढं दाट होतं की, त्यावरून माझी दृष्टी काही केल्या हटतच नव्हती आणि काही ठिकाणी झाडांची झालेली कत्तल स्पष्ट दिसत होती. आम्ही गाडी एका सुरक्षित ठिकाणी लावली आणि समोर पायीच निघालो. ते अविस्मरणीय दृश्य बघताना डोळ्याची मेमरी सुद्धा संपायची वेळ आली होती. ती निसर्गरम्य पहाट फारच उल्हासदायक होती. थोडे चालल्यावर एक वाळलेला नाला लागला व त्यानंतर आम्ही तिथून जंगलाच्या उंचवट्यावर चढू लागलो.
तितक्यात आम्हाला ठक-ठक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने गेल्यावर सात-आठ आदिवासी झाडं तोडताना दृष्टीस पडली. आम्ही समोर गेल्यावर क्षणभर सर्वांनी आमच्याकडे बघितले व परत आपले काम सुरू केले. त्यातील एकाने ‘‘पाणी हाय काय?’’ असे विचारले असता मी बॅगमधील पाण्याची बॉटल त्यांना दिली आणि सोबतीला एक प्रश्न ठेवला, ‘‘कुण्या गावचे हाय, काका?’’
‘‘वाई’’ उत्तर मिळाले.
चेतनने जंगलाबद्दल विचारपूस केली असता ते म्हणाले, ‘‘आम्ही इथं हमेशा येत नाही, आम्हाले काय माहीत?’’
आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. चेतनने वाटेत मला सांगितले हे आदिवासी इथलेच आहेत. आपण गावात जाऊन बोंबाबोंब करू या भीतीने त्यांनी आपल्याला काहीच सांगितले नाही.
हे आदिवासी या सुंदर जंगलाला उजाड करत आहे व आपल्या भावंडांप्रमाणेे असणार्या त्या वन्यप्राण्यांना संपवत आहेत.
सूर्याने सुद्धा जंगलाचा आता निरोप घेतला आणि आता लवकरच येऊ या आशेने आम्ही सुद्धा जंगलाचा निरोप घेत गावाचा रस्ता गाठला. ‘आदिवासी’ या विषयावर चर्चा करत आम्ही घरी कधी पोहोचलो ते कळलेच नाही.
आणि दुसर्या दिवशीचा बेत राखून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
परीक्षित अजयराव पितळे, अमरावती

on - शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२,
Filed under - किशोर भारत , किशोर भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा