आभार – एक प्रदर्शन!

कुठल्याही कार्यक्रमाचा होणारा शेवट म्हणजे आभारप्रदर्शन. नुकतीच एका कविसंमेलनाला हजेरी लावली. तसा कार्यक्रम धोक्याचाच. पण, जीवनात धोक्याशिवाय मजाही नाही.रिस्क फॅक्टर असला म्हणजे मजा येते. ‘शेवटचे आभारप्रदर्शन’ (ते शेवटीच असते तरीही शेवटचे,असे का म्हणतात कळत नाही) सुरू झाले. बराच वेळ झाला तरी ते संपेचना. कविता म्हणजे काय? काव्य कुठे असते? कविता कशाशी खातात, कशाशी पितात असं बरंच काही प्रबोधन पण एकदम हृदयाला भिडणारं अखंड सुरू होतं. वाटलं बाई विसरल्या दिसतात आभारप्रदर्शनाचं. सगळ्यांनाच शंका आली. बर्याच वेळाने त्या भानावर आल्या. आपल्या जबाबदारीची, कशासाठी आपण शेवटी बोलतो आहोत, याची जाणीव त्यांना झाली. श्रोत्यांनाही दीर्घ श्वास घेतला. (सुटकेचा). ही वेळ आजकाल खूप ठिकाणी येते. ऐकवणारे खूप मिळेल. आनंद मिळेल याकरिता वेळ खर्ची घालावा तर बायकोचंच म्हणणं खरं वाटतं. जात बसा तुम्हीच! काय पडलंय् त्यात? पण सुधरला, तो नवरा कसचा? अन् चांगले ऐकण्याची मजा ‘जावे त्याच्या वंशा’ तेव्हाच कळेल. गंधर्व संगीत महोत्सव दरवर्षी पुण्यात होतो. पण, हळहळणारे विदर्भातही भरपूर असतात.
असेच एकदा एका वाचनालयाने घेतलेला व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपला. शेवटी विश्वस्त उठलेत. आभार मानू लागले. खूप मोठी यादी वाचू लागले. सगळेजण चुळबूळ करू लागले. पण, यांनी कुणालाही सोडले नाही. पुस्तक वाचणार्यांचे आभार. न वाचणार्यांचे जास्त आभार. देणगीदारांचे आभार. न संपणारी यात्रा कायम सुरूच. एकदाचे संपले, तेव्हा लक्षात आले की बाप रे! केवढे मोठे हे आभार प्रकरण. खुर्चीचे आभार, टेबलाचे आभार, पुस्तके कपाटाने सांभाळली त्याचे आभार, त्यावर जमलेल्या धुळीच आभार, अन् व्यासपीठावरील लोटी-भांड्याचेही आभार, एवढेच काय ते मानायचे राहिले होते. अशा वेळी वाटतं आभारप्रदर्शनाचा अंदाज घेऊन सटकन पायात चप्पल सरकवीणारेच हुशार म्हणायचे. तसेही हे काम बहुतेक ‘ढ’ वर्गाचेच, किंवा किमान बुद्धीमत्ता लक्षणवाल्यांचे. आजकाल माईकवर यायला कुणीही भीत नाही.सगळ्यांचे शाळेपासूनच स्टेज डेअरींग वाढले असतेे.
एक सुंदर व्याख्यान रामायणाचा चिरंतन विषय. कार्यक्रम काय व्हावा असा सुंदर झाला. शेवटी आपले मॅच जिंकल्यावर हरविणारे प्रभाकर उठले. शेवटचा बॉल. आभारप्रदर्शन. नशिबाने मी त्या वेळी शेवटच्याच खुर्चीवर होतो. सुंदर व्याख्यानाचे पोस्टमार्टम सुरू झाले. काय म्हणायचं ह्या दुर्दैवाला? आपल्यासमोर आपल्या भाषणाचे तीन तेरा! कुठे सापडला हा हिरा?अशा प्रकारचे भाव वक्त्याच्या चेहर्यावर उमटताना पाहिले. नाईलाज होतो सगळ्यांचा. धन्य हो प्रभाकर! मी पटकन कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडलो.मोकळा श्वास घेतला. अवघडलेले अंग मोकळे केेले. ‘पोतेरा फिरवून राहीला आहे, सर्व कार्यक्रमावर!’ एका ज्येष्ठाचा आवाज माझ्याजवळ हळूच ऐकू आला. मी तरी काय बोलणार? त्या पेक्षा या विषयावर लिहणे बरे…
बाबा देशपांडे

on - सोमवार, २१ जानेवारी, २०१३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा