अकबर यांचे मोदीविरोधकांना उत्तर

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एम. जे. अकबर यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मोदीविरोधकांच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे. सोनिया-राहुल, शरद पवार, लालू, नितीश, ममता आणि कॉंग्रेसने पोसलेले तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक, गुजरात दंगलींचा सातत्याने उल्लेख करून सांप्रदायिक तणाव निर्माण करीत असताना, एम. जे. अकबर यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता गुजरात दंगलीला आता ११ वर्षे उलटून गेली आहेत. या ११ वर्षांत मोदींना कसेही करून दोषी शाबीत करण्यासाठी ११ हजार वेळा प्रयत्न झाले असतील! त्यासाठी विविध तपासयंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि सीबीआयचे विशेष तपास पथक नेमले गेले. या पथकाने सूक्ष्मातिसूक्ष्म बाबींचा तपास करून आपला अहवाल सादर केला. त्यात मोदींचा दंगलीत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हजारदा नाव घेणार्‍या या धर्मनिरपेक्ष पक्षांचा भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्‍वास नाही. याचा अर्थ त्यांना संविधानाची कदर नाही. कॉंग्रेसने ही बाब एकदाची जाहीर रीत्या सांगून तरी टाकली पाहिजे. पवार, लालू, नितीश आणि अन्य लोकांनीही स्पष्ट केले पाहिजे. पण, एम. जे. अकबर यांच्यासारखे विद्वान जेव्हा म्हणतात की, गुजरात दंगलींचा गेली १० वर्षे ज्या कठोरतेने तपास केला गेला, तेवढा भारतात यापूर्वी कोणत्याही दंगलीचा झाला नसेल! या तपासानंतर जो अहवाल आला तो सर्वांनाच माहीत आहे आणि न्यायालयानेही त्यावर आपला निर्णय घोषित केला आहे. मोदींविषयी त्यांना जेव्हा विचारले, तेव्हा त्यांनी सरळ सांगितले की, देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांचा एवढा प्रदीर्घ तपास यापूर्वी कधी झाला तरी आहे का? तेसुद्धा विरोधी पक्षाच्या? या दंगलीत दोषी आढळलेल्या शेकडो लोकांवर कारवाई करण्यात आली, अनेकांना शिक्षाही झाली. १९८४ च्या शीख कत्तलीत सहभागी किती लोक अजूही तुरुंगात आहेत? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित करून, मोदीविरोधकांना सडेतोड उत्तर दिले. अजून अकबर यांच्यावर कुणी दिवट्याने तोंड उघडलेले नाही. मोदींवर, चोहोबाजूंनी गुजरात दंगलींचा मुद्दा उपस्थित करून टीकेचा भडिमार होत असताना, अकबर यांचा प्रवेश झाल्याने विरोधकांची तोंडे पाहण्यासारखी झाली आहेत.
अकबर म्हणतात, आज देशाला मोदींसारख्याच नेतृत्वाची गरज आहे. देशाचे जे प्रचंड नुकसान झाले आहे, ते भरून काढण्याची वेळ आली आहे. हे नुकसान केवळ भारतीय जनता पक्षच भरून काढू शकतो, ही खात्री पटल्यानेच आपण या पक्षात आलो आहोत आणि याच मुद्यावर आपण राजकारणही करू, असे अकबर यांनी स्पष्टपणे सांगितले. आज भाजपाकडे एक सशक्त पर्याय म्हणूनच नव्हे, तर आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा केवळ हाच पक्ष रोवू शकतो, असा विश्‍वास संपूर्ण राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. त्यामुळेच भाजपाकडे अन्य नेत्यांचीही रीघ लागली आहे. एम. जे. अकबर हे यापूर्वी कॉंग्रेसचे खासदार होते. राजीव गांधींशी त्यांची जवळीक होती. पण, नंतरच्या काळात कॉंग्रेसने भ्रष्टाचाराला चालना देणारे आणि अल्पसंख्यकांचा केवळ सत्तेसाठी वापर करण्याचे जे राजकारण खेळले, त्यामुळे अकबर व्यथित झाले आहेत. आज भाजपात असे अनेक लेखक, पत्रकार, अभिनेते, अभिनेत्री, समाजसेवक येत आहेत. हा एक शुभसंदेश मानायला हवा. पण, नेमकी हीच गोष्ट विरोधकांच्या पोटात खुपत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मोदींची बाजू घेतली होती. न्यायालयावर सर्वांनी विश्‍वास ठेवायला हवा, हे तेव्हाचे त्यांचे शब्द होते. पण, कुठे माशी शिंकली कोण जाणे, आता त्यांचाही न्यायव्यवस्थेवरून विश्‍वास उठून गेल्याचे दिसत आहे! त्यांनी पुन्हा गुजरात दंगलींचा मुद्दा उकरून काढला आहे. आपण जर मोदींची तारीफ केली तर अल्पसंख्य मते दुरावतील, या भीतीने त्यांनी विधान बदलले, हे स्पष्टच आहे. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात का?
जर पवार गुजरात दंगलींचा मुद्दा उपस्थित करीत असतील, तर तोच न्याय मराठवाडा नामांतराच्या आंदोलनाबाबतही लावला गेला पाहिजे. गुजरात दंगल ही शासनप्रायोजित नव्हती, असा निर्वाळा तर न्यायालयाने दिला आहे. पण, नामांतर आंदोलन नामांतर समर्थकांना चिरडून टाकण्यासाठी पूर्णपणे प्रायोजित होते, हे जगजाहीर आहे. दलितांच्या हत्या करणार्‍या, त्यांच्या घरांची राखरांगोळी करणार्‍या एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. सर्व आरोपी मोकाट सुटले, हा इतिहास आहे. याचे उत्तर शरद पवार देतील का? अकबर म्हणतात त्याप्रमाणे गुजरात दंगलीत शेकडो जणांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. पण, नामांतर दंगलीत तर एकालाही शिक्षा झाली नाही. पवार हे जुने जाणते अनुभवी नेते आहेत. त्यामुळेच पवारांकडून ही अपेक्षा नव्हती. अल्पसंख्यकांच्या मतांसाठी महाराष्ट्रातील लक्षावधी आंबेडकरी समुदाय जर केवळ नामांतराच्या मुद्यावर पेटून उठला तर मग कॉंग्रेसचे काय होणार, हे सांगण्याची गरज नाही.
आश्‍चर्याची बाब म्हणजे नामांतराच्या आंदोलनासाठी जिवाचे रान करून ज्यांनी लॉंगमार्च काढला, ते जोगेंद्र कवाडे सर पुन्हा कॉंग्रेसचे समर्थन करतात, तेव्हा मनस्वी दु:ख होते. कवाडे सर, आंदोलनकाळात आपण कॉंग्रेसच्या दडपशाहीविरोधात जी विधाने केली होती, तिचा कदाचित आपणांस विसर पडला असेल, पण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भीमसैनिक ते अजूनही विसरलेले नाहीत. लक्षणीय बाब म्हणजे, नामांतरात ज्यांनी सहभाग दिला, त्यांचे अभिनंदन करण्याचा जाहीर सोहळा मुंबईत कवाडे सरांनीच आयोजित केला होता. त्यात भाजपाचे अनेक नेते होते. कारण, नामांतर आंदोलनाला भाजपाने संपूर्ण पाठिंबा दिला होता. असे असताना, सरांनी कॉंग्रेसला पाठिंंबा देणे ही बाब भीमसैनिकांच्या मुळीच पचनी पडलेली नाही. यापूर्वी कॉंग्रेसने सरांचा अपमान केला होता आणि सर बाहेर पडले होते. तरी हा आत्मघाती निर्णय सरांनी कसा काय घेतला, हे कळायला मार्ग नाही. आज सरांच्या पक्षाची काय स्थिती आहे? यावर अधिक न बोललेलेच बरे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.’’ एम. जे. अकबर यांनी इतिहासाचा विसर पडू न दिल्यामुळेच आज ते अगदी छाती ताणून भाजपात आले आहेत. एक नवा इतिहास घडविण्यासाठी आपण राजकारण करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हवेत लाथा झाडणारे आणि खरे विचारवंत यात हाच फरक आहे. आज देशातील दलित असो, मुसलमान असो, शेतकरी असो की कष्टकरी असो, कॉंग्रेसने त्यांच्यासाठी काय केले, हे सर्वश्रुतच आहे. ज्या मुस्लिम बांधवांच्या मतांवर गेली ६० वर्षे ज्या कॉंग्रेसने आपली सत्ता भोगली, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक उत्थानासाठी काहीही केले नाही. ते जेथे होते तेथेच आहेत. आता ६० वर्षांनंतर कॉंग्रेसला जाग आली आहे. त्याचे कारण म्हणजे आता त्यांची व्होट बँक विभागली गेली आहे. भाजपाकडे मुस्लिम समुदाय वळू लागला आहे. गुजरातेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिम समुदायाचे शंभरावर उमेदवार निवडून आले आहेत. त्यांना मोदींनी सत्ता प्रदान केली आहे. त्यांना गुजरातमध्ये मोदींबद्दल आक्षेप नाही. मग कॉंग्रेस सांप्रदायिक विष का पेरत आहे? अकबर म्हणतात, आतापर्यंत कॉंग्रेसने मुसलमानांना भाजपाची भीती दाखविण्याचे जे राजकारण खेळले, त्या राजकारणाला शह देण्यासाठी आपण भाजपात आलो आहोत. मुसलमानांना भीती भाजपापासून नाही, तर कॉंग्रेस आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरविणार्‍या पक्षांपासून आहे, असा संदेश एम. जे. अकबर यांनी दिला आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी अकबर यांच्या या संदेशाचा अवश्य विचार करावा आणि मोदींचे हात बळकट करावेत, हाच या संदेशाचा मथितार्थ आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - सोमवार, २४ मार्च, २०१४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS