वयाच्या ७१ व्या वर्षी ‘बिग बीं’ची स्टंटबाजी
‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक ऍक्शन दृश्ये दिली आहेत. परंतु, वयाच्या ७१ व्या वर्षी अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘युद्ध’ या काल्पनिक मालिकेत ‘बिग बी’ छोट्या पडद्यावर देखील ऍक्शन दृश्य करताना दिसणार आहेत. त्यामुळे अनिल कपूरच्या ‘२४’ या क्राईम थ्रिलर मालिकेनंतर आता अमिताभ युद्धसाठी सज्ज झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. एवढेच नव्हे, तर उतरत्या वयात स्टंटबाजी करताना बिग बींना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची आतुरता लागली आहे.
‘मर्द’ सिनेमातील सहायक दिग्दर्शक श्याम कुशल यांनी स्टंटबाजीचे प्रशिक्षण दिले आहे. या मालिकेची कथा उत्तम असल्याने मी होकार दिल्याने बिग बींनी ट्विटरवर म्हटले आहे. ऍक्शन दृश्य देण्यासाठी व्यक्तीची तब्येत चांगली असली पाहिजे. त्यामुळे मी रोज एक बाटली कोमट पाणी व दुधाचे सेवन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या नव्या मालिकेत अमिताभ हे युधिष्ठिर नावाच्या उद्योजकाच्या भूमिकेत दिसतात. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जे हवे ते देण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. या मालिकेत त्यांनी दोन विवाह केले आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, मुलगी आपल्या वडिलांचा नेहमीच तिरस्कार करते. तसेच ते एका जीवघेण्या आजाराने ग्रस्त असतात. ही मालिका सरस्वती क्रिएशन्स आणि अँडेमोलची निर्मिती आहे.
अमिताभ यांच्याबरोबर के. के. मेनन, नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अभिनेत्री सारिका यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. कॉर्पोरेट विश्वातील उद्योजक म्हणून असलेली लढाई आणि त्याचवेळी वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठीची लढाई लढणार्या उद्योजकाची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. या मालिकेतील काही भाग हे ‘मद्रास कॅफे’ फेम सुजित सरकारने दिग्दर्शित केले आहेत.
अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेच्या नावावरून ‘युद्ध’ असे नाव ठेवण्यात आलेली ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक प्रकाशित करण्यात आली. प्रेक्षकांना ही झलक आवडली असून मालिका देखील आवडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा