गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन
पुणे, [२ ऑक्टोबर] – गाजलेल्या चित्रपट गीतांमुळे आणि आपल्या सुरेलआवाजामुळे रसिकांच्या मनात जागा मिळविणारे ख्यातनाम पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे.
‘निसर्गराजा ऐक सांगतो…’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू…’ या गाजलेल्या गीतांसोबतच अशांती चित्रपटातील ‘शक्ती दे मा’, ‘कुदरत’ या चित्रपटाच्या शिर्षक गीतामुळे ते विशेष लोकप्रिय झाले होते.
पं. सदाशिवरावबुवा जाधव यांच्याकडून गाडगीळ यांनी किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली आणि ऑर्केस्ट्रा क्षेत्रात आपल्या गायन कारकीर्दीला सुरुवात केली. ‘लागा चुनरी में दाग’ हे गाणे सादर करताना संगीतकार राम कदम यांनी त्यांना पाहिले आणि पार्श्वगायनाची संधी दिली. ‘अरे कोंडला कोंडला देव,’ ‘अरूपास पाहे रूपी तोचि भाग्यवंत’ आणि ‘अजून आठवे ती रात्र पावसाळी’ ही त्यांची गीते अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्यसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.

on - शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा