अमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

मुंबई, [११ ऑक्टोबर] – सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या वयाला रविवारी ७३ वर्ष पूर्ण झाली असून, त्यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केले. आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी साजरा केला. मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करण्याचे महानायकाने ठरविले आहे.
सामान्य दिवसाप्रमाणे मी माझ्या कुटुंबासोबत दिवस घालविला. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मी अतिशय समाधानी आहे. माझे वर्तमान ही माझ्यावर असलेली भगवंताची कृपा आहे. जीवनातील याआधीची वर्षे माझ्यासाठी बक्षीस आहे, असे तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. दिवार, शोले, डॉन, अभिमान, अग्निपथ, सत्याग्रह, पीकू अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप त्यांनी प्रेक्षकांवर उमटवली आहे. चार दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले अधिराज्य गाजवले आहे. १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. अभिनयापासून ते टेलिव्हिजन शोचे आयोजन, गायक, निर्माता, अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या आहेत. एवढेच नव्हे तर राजकारणातही ते सक्रिय आहेत. मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांची मुलगी आराध्यासोबत वेळ घालविण्यात महानायकाला अतिशय आनंद वाटतो.

on - रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा