आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक
नंदुरबार, [१४ जानेवारी] – आपल्या समाजाचे मूळ दर्याखोर्यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी अर्थात आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक आहेत. त्यांच्या समस्यांशी व दु:खाशी समरस व्हा आणि एकसंध राहा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सातपुडा हिंदू मेळाव्यात बोलताना केले.
नंदुरबारला गुरुवारी सातपुडा हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला होता. महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज, देवगिरी प्रांताचे संघचालक गंगाधर पवार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. आपल्या सुमारे अर्धा तासाच्या भाषणात डॉ. भागवत यांनी आदिवासी समाजाबद्दल आपला आदर व्यक्त करीत आदिवासीच खरा संस्कृतिरक्षक असल्याचे सांगितले. दर्याखोर्यात राहणार्या आदिवासी समाजाने कधीही लाभाचा आणि स्वार्थाचा विचार केला नाही. इंग्रजांशी लढताना केवळ देश व संस्कृती हेच डोळ्यासमोर ठेवून अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला. त्यांनीच खर्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे रक्षण केले आहे. आज संस्कृतीचा हा रक्षणकर्ता विविध समस्या, प्रश्नांनी ग्रासला आहे. या समस्यांशी एकरूप व्हा आणि एकसंध होऊन ते प्रश्न सोडवा. ऐक्यातूनच समस्या सोडविण्याचा मार्ग सापडतो. त्यामुळे एकोप्याचे भाग्य हातात घेऊन ते सजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.
ते म्हणाले, आज अनेकजण धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्यांचा हेतू साध्य होऊ शकत नाही. आणखी पाच वर्षे आपण एकसंध राहिलो तर जगावर भारत देश राज्य करेल. त्यादृष्टीने आपली पावले पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज यांनी, हिंदू धर्माची परंपरा महान आहे; तिला टिकवून ठेवण्याचे काम आपल्याला करावयाचे असल्याचे सांगितले. आदिवासींचे मूळ स्थान असलेल्या जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे. वनउपज कमी होत चालली आहे. त्यामुळे आदिवासी विकासासाठी, त्यांच्या उत्थानासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावी. त्यासाठी केंद्र सरकारला आपण साकडे घालू, असेही त्यांनी सांगितले. मेळाव्याला विविध ठिकाणाहून आलेले धर्मगुरू, साधू, संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर गावीत यांनी केले. मेळाव्याला ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यापूर्वी डॉ. मोहनजी भागवत यांनी दक्षिणकाशी प्रकाशा येथे जाऊन केदारेश्वराची महापूजा केली.
अमेरिकेसारखी दुटप्पी मैत्री नको
अमेरिका एकीकडे पाकिस्तानला शस्त्रास्त्र व अर्थसाह्य पुरवते आणि दुसरीकडे पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा, असा सल्ला देत भारत-पाक मैत्रीचे संबंध दृढ व्हावे, असे सांगते. ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. त्यामुळे मैत्री अशी नको, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रकाशा, ता. शाहादा येथे केले. ते येथे आपले वर्गमित्र डॉ. सुरेश पाटील यांच्या भेटीसाठी आले होते. त्याठिकाणी निमंत्रित कार्यकर्त्यांपुढे संबोधित करताना ते बोलत होते. तब्बल ४५ मिनिटे त्यांनी येथे भाषण केले. मित्राला भेटण्यासाठी आल्याने त्यांच्या या भाषणाचा सूर ‘मैत्री’ या शब्दाभोवतीच होता.

on - शनिवार, १६ जानेवारी, २०१६,
Filed under - ठळक बातम्या , रा. स्व. संघ , विदर्भ
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा