’शाकुंतलम’ हिट, पहिल्याच दिवशी केली ५ कोटींची कमाई!

मुंबई, (१५ एप्रिल) – अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा चित्रपट ’शाकुंतलम’ १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगलीच ओपनिंग केली आहे. समांथाच्या चाहत्यांना थिएटरमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यासोबतच चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आले आहे.
साउथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. शकुंतलम या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट पौराणिक कथांशी संबंधित असल्याचे समजते. रिलीजपूर्वी समंथा अनेक कार्यक्रमांमध्ये त्याचे प्रमोशन करताना दिसली. अखेर काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने जवळपास ५ कोटींची कमाई केली आहे. हे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचे मानले जात आहे. आदल्या दिवशी समोर आलेल्या अंदाज अहवालात असा दावा करण्यात आला आहे की चित्रपट पहिल्या दिवशी ४ ते ४.५ कोटींची कमाई करू शकेल. परंतु प्रत्यक्षात मात्र पहिल्या दिवशीची कमाई या पेक्षा जास्त झाली आहे.
समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन अभिनीत हा चित्रपट महाकवी कालिदासाच्या अभिज्ञानासकुंतलम या महाकाव्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने महाराज दुष्यंत यांच्या पत्नी शकुंतलाची भूमिका साकारली आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती प्रेमासाठी आसुसलेली आहे. ही अतिशय सुंदर पौराणिक कथा एखाद्या परीकथेसारखी पडद्यावर आणली आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा