विलायचीच्या दरांत सातत्याने वाढ

बीड, (१४ एप्रिल) – सणासुदीच्या दिवसांत गोडपदार्थ करण्यासाठी विलायचीचा वापर ठरलेला असतो, पण आता विलायचीची चव तिखट होणार आहे. गत काही काळापासून मसाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणार्या विलायचीचे भाव सतत वाढत आहेत. विलायचीच्या दरात प्रती किलो १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे मसाल्यांसह विविध मिष्ठान्न पदार्थांची चव बदलण्याची शक्यता आहे.
भारतात सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन केरळमध्ये होत असते. महाराष्ट्रात सर्वाधिक विलायचीची आवक ही केरळातूनच होते; मात्र गत महिनाभरापासून विलायचीला बाहेर देशातून मागणी वाढली आहे. त्यातच उत्पादन घटल्यामुळे विलायचीचे भाव गत एक महिन्यापासून वाढत गेले आहेत. यामुळे आता गोड पदार्थातून मसाल्यांची राणी विलायची गायब होण्याच्या मार्गावर आहे. तर, सामान्यांच्या आहारालाही आता महागाईच्या झळा बसत आहेत.
वेलचीचे आरोग्यासाठी फायदे
आरोग्याच्या दृष्टीने विलायचीचे विशेष महत्त्व आहे. विलायचीच्या खाण्याने शरीरात अनेक फायदे होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. अॅसिडिटी, तणाव, रक्तदाब, बद्धकोष्ठता, युरीन इन्फेक्शन, पचनाचा त्रास अशा विविध गोष्टींसाठी विलायची उपयुक्त आहे, पण मसाल्याच्या पदार्थातून विलायची बेपत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा धोका आरोग्यालाही निर्माण होऊ शकतो.

on - शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३,
Filed under - कृषी भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा