दत्ताजींचे वैचारिक अधिष्ठान जीवनात झळकावे

-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे विचार,
-दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी,
नागपूर, (०६ ऑगस्ट) – दत्ताजी डिडोळकर, यशवंत केळकर आदींसह अनेकांनी राष्ट्रासाठी जीवनभर कार्य केले. त्यांचे वैचारिक अधिष्ठान आपल्या दैनंदिन जीवनात झळकायला हवे; तरच दत्ताजींच्या जन्मशताब्दीचे सार्थक होईल, असे विचार रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज व्यक्त केले. रा. स्व. संघाचे प्रचारक, अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाच्या प्रमुख रचयितांपैकी एक दत्ताजी डिडोळकर यांचा जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन आज सुरेश भट सभागृहात झाले.
दत्तात्रेय होसबळे यांच्यासह जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सचिव अजय संचेती, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. राजशरण शाही तसेच संयोजक डॉ. मुरलीधर चांदेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आपल्या उद्बोधनात म्हणाले की, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे दोघेही अद्भुत तसेच व्यक्ती व राष्ट्र निर्माणाचे उत्तम व्यवस्थापक होते. संघाचे वैशिष्ट्य हेच आहे की, मूळ सर्वांना एकच मिळते. वैचारिक अधिष्ठान एकच असून, ते मांडायची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. दत्ताजी डिडोळकर असेच व्यक्तिमत्व होते.
असंभव हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हता. दत्ताजी कार्यकर्त्याप्रति आत्मीयता जपणारे होते. कार्यकर्ता वयाने कितीही लहान असो दत्ताजींचे संबंध त्याच्याशी मित्रत्वाचे असायचे. मी तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी असल्याचा आविर्भाव त्यांच्यात नसायचा. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मार्ग शोधणे, कार्यकर्त्याला बांधून ठेवणे, योग्य मार्ग दाखविणे, लवचिकता हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कार्यपद्धती आणि विचारांशी कधीच तडजोड केली नाही.
प्रत्येक स्वयंसेवकांमध्ये डॉ. हेडगेवार तसेच विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये दत्ताजी, यशवंतराव केळकर असायला हवेत. संघटनेत कौटुंबिक भाव जोपासण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे स्मरण म्हणजे एका ध्येयनिष्ठ विचारधारेचे स्मरण आहे. जीवन कसे जगावे याचे ते आदर्श होते. विवेकानंद स्मारक जोपर्यंत आहे तोपर्यंत दत्ताजींचे चिरस्थायी असल्याचे होसबळे म्हणाले.

on - रविवार, ६ ऑगस्ट, २०२३,
Filed under - रा. स्व. संघ
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा