आन्ध्रतील चमत्कारिक कनिपकम विनायक मंदिर
या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिरातील गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आणि चमत्कारिक आहे. गणपतीची मूर्तीचा आकार सारखा राहत नाही, जसजसा काळ जातो, तसतसा मूर्तीचा आकारही वाढत आहे. चित्तूर जिल्ह्यात लोक केवळ तिरुपती, तिरुमला आणि श्रीकालहस्तीमुळेच येत नाहीत तर, जवळच असलेल्या कनिपकम्मुळेही येथे भाविकांची गर्दी दिसून येते. या मंदिराला पाण्याच्या देवाचे मंदिर देखील म्हटले जाते आणि हे मंदिर चित्तूर जिल्ह्यातील इराला मंडल येथे आहे. या मंदिर परिसरात असलेल्या पवित्र पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात, असे सांगितले जाते. तिरुपतीला जाण्यापूर्वी सर्व भाविक या विनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
हे मंदिर ११ व्या शतकात चोल राजा कुलोथुंगा चोल प्रथम याने बांधले होते आणि नंतर विजयनगर वंशाच्या राजाने १३३६ मध्ये या मंदिराला खूप व्यापक रूप दिले. या मंदिरात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ब्रह्मोत्सव आणि गणेश चतुर्थी हे सण एकत्र साजरे केले जातात. ब्रह्मोत्सवादरम्यान सर्व बाजूंनी आणि भाविकांच्या मध्यभागी रथ मिरवणूक काढली जाते. या उत्सवादरम्यान दुसर्या दिवसापासून सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा रथयात्रा काढली जाते.
रस्त्याने हे मंदिर तिरुपती बस स्थानकापासून फक्त ७२ किमी अंतरावर आहे. रेल्वेने जायचे असल्यास तिरुपती रेल्वे स्टेशन या मंदिराजवळ आहे आणि ते मंदिरापासून फक्त ७० किमी अंतरावर आहे. कनिपकम् मंदिर पूर्णपणे नदीच्या मध्यभागी आहे. ज्या नदीत हे मंदिर आहे त्या नदीतील पाणी कधीच संपत नाही. असे मानले जाते की एकदा ब्रह्मदेव स्वतः पृथ्वीवर आले आणि तेव्हापासून या मंदिरात २० दिवस ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उत्सव सुरू होतो. या उत्सवादरम्यान श्रीगणेश रथात विराजमान असतात. अशा प्रकारचा उत्सव फार कमी मंदिरांमध्ये साजरा केला जातो.

on - शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३,
Filed under - अध्यात्मिक , फिचर
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा