तारुण्य टिकविण्यासाठी लाखो गाढवांचा बळी
नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – कष्टाळू प्राणी आणि गरीबांचा घोडा म्हटल्या जाणार्या गाढवाची कोणी कशाला कत्तल करेल? सामान वाहून नेण्याच्या कामाशिवाय गाढवांचा उपयोगच काय? असे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पण, झुरळांपासून कुत्र्यांपर्यंत प्रत्येक प्राणी खाणार्या चिन्यांची वक्रदृष्टी आता गाढव या निरुपद्रवी प्राण्यावर पडली आहे. मेहनतीचं काम करणार्या प्राण्यांची संख्या जास्त असलेल्या आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये गाढवांची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. गाढवाच्या कातडीला सौंदर्य प्रसाधने आणि तारुण्य टिकवून ठेवण्याच्या औषधांमध्ये खूपच मागणी आहे.
गाढवाच्या कातडीमधील जिलेटिनचा वापर करून ‘इजियाओ’ नावाचे पारंपरिक औषध तयार केले जाते. या औषधाला चीनमध्ये प्रचंड मागणी आहे. या औषधामध्ये आरोग्य-वर्धक आणि तारुण्य टिकवण्याचे गुणधर्म आहेत, असं मानलं जातं. जिलेटिन काढण्यासाठी गाढवाचं कातडं उकळलं जातं. त्याची पूड, गोळ्या, द्रव्यात रुपांतर केलं जातं किंवा ते अन्नामध्ये मिसळण्यात येतं. २०१७ पासून या व्यापाराच्या विरोधात मोहीम चालवणार्या डाँकी सॅन्च्युरीच्या नवीन अहवालानुसार, दरवर्षी जागतिक स्तरावर या औषधाचा पुरवठा करण्यासाठी किमान ६० लाख गाढवांची कत्तल केली जाते. इजियाओच्या उद्योगधंद्याला पुरवठा करण्यासाठी नेमकी किती गाढवं मारली जातात याची अचूक माहिती मिळणं अतिशय कठीण आहे.
जगातील एकूण गाढवांपैकी सुमारे दोन तृतीयांश गाढवं आफ्रिकेत असून गाढवाच्या कातड्याची निर्यात काही देशांमध्ये कायदेशीर, तर काही देशांमध्ये बेकायदेशीर आहे. इजियाओचे उत्पादक आतापर्यंत चीनमध्ये मिळणार्या गाढवांची कातडी वापरत असत. परंतु, तेथील गाढवांची संख्या घसरून २० लाखांवर आली आहे. इजियाओ हे एक चैनीचं औषध म्हणून लोकप्रिय आणि भरपूर उपलब्धता असलेलं उत्पादन ठरलं आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये गाढवांचे कत्तलखाने स्थापन करण्यात आले आहेत. या औषधाला असलेली प्रचंड मागणी बघता, त्याच्या उत्पादनाविरोधात निर्णय घेणे, सध्यातरी शक्य होणार नसल्याचेच चित्र आहे.

on - रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा