महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई, (२३ फेब्रुवारी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बुधवारी पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. खासगी वैद्यकीय सुविधेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी १९९५ ते १९९९ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि राज्यात सर्वोच्च पद भूषवणारे अविभाजित शिवसेनेचे पहिले नेते होते. ते खासदार म्हणूनही निवडून आले आणि २००२ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ते लोकसभेचे अध्यक्ष होते. जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मनोहर जोशी यांचा मुलगा उमेश यांनी सांगितले. त्याआधी त्यांचे पार्थिव माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले शोक
मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते ज्यांनी लोकसेवेत वर्षे घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदार्‍या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशीजी यांना चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेले आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती.
सुसंस्कृत चेहरा हरवला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
सच्चा शिवसैनिक गमावला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, भावपूर्ण श्रद्धांजली !
अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही.
महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी केलेलं कार्य कायम स्मरणात : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
मनोहर जोशी यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी सरांनी अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने मुंबईचे नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतीक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS