लूट करणार्यांना पै-पैचा हिशेब द्यावा लागेल

– झारखंडमध्ये मोदींच्या हस्ते ३५,७०० कोटी प्रकल्पांचे लोकार्पण,
धनबाद, (०१ मार्च) – झारखंडमध्ये झामुमो-काँग्रेसचे घराणेशाहीचे सरकार बनले, तेव्हापासून सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. राज्यात वसुली सुरू असून, झामुमोचा अर्थच जमून खा, असा झाला आहे. जनतेच्या पैशाची लूट करणार्यांना पै-पैचा हिशेब द्यावा लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
शुक्रवारी झारखंडच्या धनबादमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३५,७०० कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण व पायाभरणी करण्यात आली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन व काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. कार्यक्रमापूर्वी मोदींचा धनबादमध्ये रोड शो झाला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारोंच्या संख्येत जमलेल्या लोकांनी मोदी, मोदींच्या घोषणा दिल्या.
झारखंड दौर्यात मोदी यांनी धनबाद जिल्ह्यातील सिंद्री येथील हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेडचा ८,९०० कोटींचा खत प्रकल्प देशाला समर्पित केला. यावेळी झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री चंपई सारेन यांची उपस्थिती होती. या प्रकल्पामुळे युरियाच्या उत्पादनात १२.७ लाख मेट्रिक टनने भर पडणार असून, खताच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पऊल असल्याचे ते म्हणाले. सिंद्री खत प्रकल्पाचे पुनर्रज्जीवन करण्याची मोदींची हमी होती, ती आज पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
घोटाळे करणारे चौकशीपासून पळतात
बरवाडा येथे ‘रोड शो’नंतर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, झामुमो आणि काँग्रेस झारखंडच्या जनतेची लूट करीत आहे. सरकारमधील मंत्री स्वत:ची तिजोरी भरण्याचे काम करीत आहे. आदिवासी समाजाचा वापर केवळ मतदानापुरता केला जात आहे. झामुमोचे नेतृत्व करणारे एकाच कुटुंबातील आहे. त्यांना केवळ स्वत:च्या कुटुंबीयांची व मुलांच्या भविष्याची चिंता आहे. जनतेचा विकास व गरीब, आदिवासी समाजाशी घेणेदेणे नाही.
पाच वर्षांपूर्वी दिलेली हमी पूर्ण केली
मोदी म्हणाले, माझ्या मागील जन्माचे पुण्य असेल की, मला जनतेचे इतके प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. मी पाच वर्षांपूर्वी सिंद्री येथील खत प्रकल्प सुरू करण्याची हमी दिली होती. तुम्हाला वाटले असेल की, हा कारखाना सुरू होणार नाही; मात्र मी तुम्हाला दिलेली हमी पूर्ण केली आहे. भाजपाचा अर्थच विकास आहे आणि काँग्रेसला केवळ घोटाळे करण्याचे माहीत आहे, अशा शब्दांत मोदी यांनी हल्ला चढविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा