अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढणार!

– लोकसभेचे ३ उमेदवार केले जाहीर,

अकोला, (०३ मार्च) – महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीचे मला निमंत्रण नाही आहे. ६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण. पुण्यात मोदीबागेत नेहमी जात असतो. माझ्या दोन मेव्हण्या सुद्धा तिथे राहतात, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या बातम्या देखील अधुनमधून येत होत्या. परंतु, महाविकासआघाडी आणि वंचितचे जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नव्हते. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांनी परस्पर लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मविआतील बोलणी फिस्कटल्याचे दिसून येत आहे. आता मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास २०१९ प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा ’एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसेल.
लोकसभेच्या कोणत्या जागांवर उमेदवार केले जाहीर?
रविवारी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर लढतील. तर वंचितकडून वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मविआचे नेते हे परस्पर झालेले जागावाटप मान्य करुन वंचितला आपल्यात सामावून घेणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीशी युती होणार का, असा प्रश्नदेखील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, आम्हीदेखील त्याबाबत अद्याप संभ्रमात आहोत. आम्ही मविआचा भाग आहोत किंवा नाही, हेच आम्हाला अजूनपर्यंत कळलेले नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मविआसोबत जुळलं नाही तर पुढचं काहीच सांगू शकत नाही: प्रकाश आंबेडकर
आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मविआकडे पोहचवली आहे. मविआने १५ जागा ओबीसी आणि ३ अल्पसंख्याकांना द्यावा. माध्यमांमध्ये आमच्या मुद्द्यांना आमच्या अटी म्हणून सांगितलं गेलं, मात्र हे तसं नव्हे. मविआला आम्ही आमचं म्हणणं मांडलंय. त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जाऊ नका असे सांगितल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ६ तारखेपर्यंत सगळं काही सुरळीत होणार, या वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दल माहीत नाही. त्यांच्यातील १५ जागांवरचा तिढा सुटला तर पुढे बघू. एकटं लढलो तर आमची लढत भाजपसोबत. मविआसोबत नाही जुळलं तर सध्या काहीच सांगू शकत नाही. पुढच्या मविआच्या बैठकीचं निमंत्रण नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, ३ मार्च, २०२४,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS