चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले
इस्लामाबाद, (०२ एप्रिल) – पाकिस्तानच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलत खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवरील काम थांबवले आहे. सोबतच चीन आपल्या सुमारे १५०० नागरिकांना मायदेशी बोलाविणार आहे. पाकिस्तानी अधिकार्यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे. आम्ही आणखी जोखीम घेऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. तिन्ही प्रकल्प ९८६० मेगावॅटचे आहेत.
४३२० मेगावॅट क्षमतेचा दासू धरण प्रकल्प कोहिस्तान जिल्ह्यात आहे. हे पेशावरपासून ३५० किमी अंतरावर आहे. मारले गेलेले अभियंते याच ठिकाणचे होते. ७४१ चिनी आणि ६,००० स्थानिक कर्मचारी आहेत. चिनी नागरिकांना बाहेर काढले जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक कर्मचार्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर चिनी कामगार घाबरले असल्याचे प्रकल्पाच्या अधिकार्याने सांगितले. स्वात नदीवर असलेले धरण यावर्षी पूर्ण होणार आहे. ७४० मेगावॅट जलविद्युत निर्माण होईल. तेथे २५० चिनी कर्मचारी काम करीत आहेत. या प्रकल्पांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, दासू आणि दियामेर-भाषा धरणांमधून चिनी नागरिकांना लष्करी हेलिकॉप्टरने किंवा रस्त्यावर संचारबंदी लागू करून बाहेर काढले जाईल. चिनी नागरिक लवकरच पाकिस्तानमधून चीनला जाऊ शकतात.

on - मंगळवार, २ एप्रिल, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा