जम्मू-काश्मिरात लष्कराची मोठी कुमक तैनात
नवी दिल्ली, (२० जुन) – देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचे हे सावट गडद होत असल्याचे पाहता केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने रातोरात संपूर्ण मोर्चा जम्मू-काश्मिरात वळवला असून, इथे सध्या लष्कराच्या तीन हजार जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ही सूत्रे हलण्यास सुरुवात झाली आणि रातोरात लष्कराची मोठी कुमक या भागात तैनात करण्यात आली. फार काळानंतर या भागात लष्कराच्या एकंदर हालचाली आणि सशस्त्र सैनिक तैनात झाल्याचे पाहता, येत्या काळात भारतीय लष्कर एखाद्या मोठ्या कारवाईच्या दृष्टीने पावले उचलू शकते, असे संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये तीन हजार अतिरिक्त सशस्त्र जवान तैनात करण्यात आले असून, यात ५०० पॅरा कमांडो तसेच सीआरपीएफचा समावेश असून, सीमेनजीकच्या हालचालींना आता प्रचंड वेग मिळताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता याआधी कलम ३७० निष्प्रभ करण्यासाठीच्या हालचाली केंद्राकडून सुरू झाल्या, त्यावेळी काश्मीर खोर्यात फौजफाटा वाढवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा काश्मीरच्या खोर्यात दहशतवाद्यांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याच धर्तीवर इथे लष्कराची उपस्थिती लक्ष वेधून जात आहे. पूंछ, कठुआ, डोडा अशा भागांमध्ये लष्कराचे अनेक जवान तैनात असून, या सर्व भागांमध्ये शोधमोहीम हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा