पंतप्रधान मोदी यांनी केले नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण

मुंबई, ८ ऑक्टोबर - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा अखेर संपली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 ऑक्टोबर)  या विमानतळाचे उद्घाटन केले आहे. हे विमानतळ केवळ मुंबई आणि संपूर्ण पश्चिम भारताच्या हवाई प्रवासासाठी मोठा दिलासा आणि चालना (बूस्ट) नाही, तर जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे एक प्रभावी प्रतीक देखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी आपल्या भाषणात लोकनेते दि.बा. पाटील यांच्या कार्याचे स्मरण केले, तसेच काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुंबईला मिळालेल्या या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह पूर्णपणे अंडरग्राउंड मेट्रोच्या लोकार्पणाने भारताच्या विकासाची झलक दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारताच्या वाटचालीवर भाष्य करताना त्यांनी युवकांसाठीच्या संधी, पायाभूत सुविधांचे महत्त्व आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर जोर दिला.

मुंबईची दीर्घ प्रतीक्षा आणि पायाभूत सुविधांचे यश

पंतप्रधान मोदी यांनी मुंबईकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपल्याचे जाहीर केले. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. यासह, शहराला पूर्णपणे अंडरग्राउंड मेट्रो देखील मिळाली असून, हे दोन्ही प्रकल्प विकसित होत असलेल्या भारताचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेट्रो लाईनमुळे आता २ तासांचा  प्रवास फक्त 30 ते ३५ मिनिटांत पूर्ण होईल, ज्यामुळे मुंबईकरांचा अमूल्य वेळ वाचणार आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

दि.बा. पाटलांचे स्मरण आणि विमानतळाचे महत्त्व

पंतप्रधानांनी आजच्या दिवशी लोकनेते दि.बा. पाटील यांचेही आदराने स्मरण केले आणि त्यांनी केलेले कार्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प म्हणजे विकसित भारताची झलक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बनलेल्या या विमानतळाचा आकार कमळासारखा असून ते संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, उडान योजनेमुळे गेल्या 10 वर्षांत अनेकांना पहिल्यांदा विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

युवकांसाठी संधी आणि नवीन कौशल्य विकास

पंतप्रधानांनी सध्याचा काळ हा भारतातील युवकांसाठी  अपार संधी देणारा काळ असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारने पीएम सेतू योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर, आजपासून महाराष्ट्र सरकारने आयटीआय आणि तांत्रिक विद्यालयांसाठी नवा कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे युवकांना ड्रोन, रोबोटिक्स, ईव्ही, सोलार एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, अशा नवीन आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे ट्रेनिंग मिळेल, ज्यामुळे त्यांची कौशल्ये वाढतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसवर जहरी टीका

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये झालेल्या विलंबावरून पंतप्रधानांनी यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. काही काळासाठी आलेल्या सरकारने विमानतळाचे काम थांबवले, ज्यामुळे देशाचे हजारो कोटींचे  नुकसान झाले. या विलंबामुळे मुंबईकर ३-४ वर्षे  या महत्त्वाच्या सुविधेपासून वंचित राहिले. हा विलंब 'पापापेक्षा कमी नाही' अशी टीका पंतप्रधानांनी केली. 

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी काँग्रेस सरकारने कमकुवतपणा दाखवत दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकल्याचा संदेश दिला. काँग्रेसच्या एका माजी गृहमंत्र्याच्या विधानाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होते, पण एका काँग्रेस नेत्याच्या आईने दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येऊन सैन्याला हल्ला करण्यापासून रोखले.

विदेशी दबावाखाली येऊन हा निर्णय घेणारा व्यक्ती कोण, हे हे काँग्रेसनं देशाला सांगावे, अशी मागणी पंतप्रधानांनी केली. काँग्रेसच्या या कमकुवक धोरणांमुळे दहशतवाद्यांना बळकटी मिळाली आणि देशाची सुरक्षा कमकुवत झाली. याउलट, आजचा भारत दमदार उत्तर देतो आणि घरात घुसून मारतो, असे ठणकावून सांगत पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेप्रती सरकारची बांधिलकी स्पष्ट केली.

स्वदेशीचा अंगीकार: आर्थिक विकासाचा मंत्र

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी स्वदेशीचा अंगीकार करण्यावर भर दिला. 'हा प्रत्येक घराचा आणि बाजाराचा मंत्र असला पाहिजे,' असे ते म्हणाले. जेव्हा प्रत्येक नागरिक स्वदेशीचा अंगीकार करेल, तेव्हा देशाचा पैसा देशातच राहील, ज्यामुळे भारताचे सामर्थ्य प्रचंड वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


✎ Edit

Posted by - Admin,
on - बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS