मुंबई मेट्रो ३ चा अंतिम टप्पा आज उद्घाटन
-पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच विदर्भ, खानदेशला मोठी भेट!,
मुंबई, ७ ऑक्टोबर - मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक (वरळी) ते कफ परेड या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याचे उद्घाटन होणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे.
मुंबईची 'पहिली भूमिगत' मेट्रो
हा मेट्रो मार्ग एकूण 33.5 किलोमीटर लांबीचा असून, आरे कॉलनी (उत्तर) ते कफ परेड (दक्षिण) यांना जोडतो. हा मुंबईतील पहिला संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग आहे, ज्यामुळे शहराच्या दक्षिणेकडील व्यावसायिक केंद्रे पश्चिम आणि मध्य उपनगरांशी थेट जोडली जातील.
या मार्गावर एकूण 27 स्टेशन्स आहेत. आरे डेपो वगळता सर्वच्या सर्व स्टेशन्स भूमिगत (Underground) आहेत. रस्त्याने आरे ते कफ परेड हे अंतर पार करण्यासाठी सामान्यतः 2 तासांहून अधिक वेळ लागतो, मात्र आता मेट्रो-3 मुळे हा प्रवास अवघ्या 54 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
या 11 स्टेशन्सचे होणार उद्घाटन
बुधवारी म्हणजेत 8 ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे चौक (वरळी) ते कफ परेड या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरील खालील 11 स्टेशन्स प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. या स्टेशन्सची मराठी आणि इंग्रजी नावे खालीलप्रमाणे:
विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकरशेट, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड.
संपूर्ण 'अॅक्वा लाइन' वरील स्टेशन्सची नावे (आरे ते कफ परेड)
आरे JVLR, सीप्ज, अंधेरी MIDC, मरोळ नाका, CSMIA टी2, सहारा रोड, CSMIA टी1, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, बीकेसी, धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगांव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड.
इतर वाहतूक मार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी
या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईच्या सध्याच्या वाहतूक जाळ्याशी थेट जोडणी साधली जाणार आहे.
उपनगरीय रेल्वे: मुंबई सेंट्रल, सीएसएमटी आणि चर्चगेट येथे उपनगरीय रेल्वेशी इंटरचेंज उपलब्ध असेल.
मेट्रो लाइन 1: मरोळ नाका येथे मेट्रो मार्गिका 1 (घाटकोपर-वर्सोवा) शी जोडणी.
विमानतळ: देशांतर्गत (T1) आणि आंतरराष्ट्रीय (T2) विमानतळांना थेट कनेक्टिव्हिटी.
तिकीट दर
मुंबई मेट्रो 3 मध्ये अंतरावर आधारित तिकीट दर रचना लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्व प्रवाशांना परवडणारे भाडे निश्चित करण्यात आले आहे.प्रवाशांना 3 किमी पर्यंतच्या अंतरासाठी 10 रुपये मोजावे लागतील. ज्या प्रवासाचे अंतर 3 ते 12 किमी दरम्यान असेल, त्यांना 20 रुपये शुल्क आकारले जाईल, तर 12 ते 18 किमीच्या मध्यम-अंतरासाठी 30 रुपये तिकीट असेल. त्याहून अधिक, 18 ते 24 किमी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 40 रुपये आणि 24 ते 30 किमीसाठी 50 रुपये भरावे लागतील. 30 ते 36 किमीच्या प्रवासासाठी तिकीट 60 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही तिकीट दर https://mmrcl.com/en/fare-recharge या अधिकृत वेबसाईटला चेक करु शकता.
प्रमुख स्टेशनसाठी लागणारा तिकीट दर
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड: 40 रुपये
आरे JVLR ते कफ परेड: 70 रुपये
आरे JVLR ते सिद्धिविनायक: 60 रुपये
दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो: 50 रुपये
या मार्गावर दररोज 17 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन आर्थिक राजधानीच्या दळणवळणाची व्याख्या नव्याने निश्चित होण्यास मदत होईल.
मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मोठं गिफ्ट!
2 रेल्वे प्रकल्पांमुळे विदर्भ ते खानदेश प्रवास होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 24,634 कोटी रुपयांच्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये, महाराष्ट्रातील दोन मोठ्या मार्गांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (7 ऑक्टोबर 2025) रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्या अगदी तोंडावर राज्याला हे 'गिफ्ट' मिळाल्याने कोकण, विदर्भ आणि खानदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवा आयाम मिळणार आहे.
या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत 24,634 कोटी रुपये असून, 894 किलोमीटर लांबीच्या नव्या लाईन्स 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना थेट फायदा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे दोन प्रकल्प (398 किमी)
महाराष्ट्रातील रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण मार्गांना मंजुरी मिळाली आहे.
महत्त्व: विदर्भ आणि खानदेशाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. भुसावळ हे मोठे रेल्वे जंक्शन असल्याने, या मार्गामुळे मुंबई-कोलकाता (हावडा) मुख्य मार्गावरील वाहतुकीची गर्दी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांची गती वाढेल, ज्यामुळे कोकणातून विदर्भ किंवा मध्य भारताकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान होईल.
गोंदिया-डोंगरगड चौथी लाईन (84 किमी):
महत्त्व: हा मार्ग महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याशी जोडतो. हा अत्यंत महत्त्वाचा कोळसा वाहतूक मार्ग असल्याने, चौथी लाईन झाल्यावर औद्योगिक मालवाहतुकीत प्रचंड वाढ होईल. गोंदिया-डोंगरगड मार्गाचा फायदा मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भातील अनेक भागांना होणार आहे.
85 लाखांहून जास्त लोकांना प्रत्यक्ष लाभ
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या चारही प्रकल्पांमुळे सुमारे 3,633 गावांमधील 85 लाखांहून अधिक लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील.
या नवीन लाईन्समुळे रेल्वे मार्गावरील ट्रेनची गर्दी कमी होईल. गाड्यांची गती वाढेल आणि वेळेवर धावण्याची क्षमता सुधारेल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर लॉजिस्टिक कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यामुळे दरवर्षी 780 लाख टन (78 Million Tonnes) अतिरिक्त मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.
पर्यावरणाचे मोठे संरक्षण
हा प्रकल्प ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणाला अनुकूल असा आहे. या वाहतूक सुधारणांमुळे वातावरणातील 139 कोटी किलोग्राम कार्बन उत्सर्जन घटेल. पर्यावरणाचा हा फायदा सुमारे 6 कोटी (60 Million) झाडे लावल्याच्या बरोबरीचा आहे.
पंतप्रधान 'पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन' च्या माध्यमातून मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देत आहेत आणि हा निर्णय त्याच दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.

on - बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - महाराष्ट्र , मुंबई-कोकण
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा