पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त!
लंडन, (२१ एप्रिल) – पुरुषांच्या तुलनेत तरुण महिलांना हृदयविकाराशी संबंधित रोग जास्त प्रमाणात होतात, असे तज्ज्ञांनी सखोल अभ्यासानंतर काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे.
ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने (बीएचएफ) १६ ते ४४ या वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ब्रिटनमध्ये ५ लाख ७० हजार पुरुषांच्या तुलनेत ७ लाख १० हजार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचा हृदयरोग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हृदयाशी संबंधित तक्रारींकडे महिला दुर्लक्ष करतात, असा स्पष्ट संकेत यातून मिळतो, असे बीएचएफचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर पीटर वेईसबर्ग यांनी सांगितले. हृदयरोग फक्त पुरुषांनाच होतो, असा महिलांचा समज असल्यामुळे या रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. महिलांनाही हृदयरोग होतो आणि काहीवेळा याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते, असेही ते म्हणाले.
‘कोरोनरी आर्टरी डिस्सेक्शन’ यासारख्या दुर्धर रोग होणार्या १० रोग्यांमध्ये ८ महिला असतात. त्यामुळे काही दुर्मिळ रोगांची लागण महिलांना जास्त होण्याची शक्यता असल्यामुळेच हे प्रमाण वाढलेले दिसते, असे डॉक्टरांचे मत आहे. अशा दुर्मिळ घटनांबाबत फार गांभीर्याने संशोधन केले जात नाही, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणार्या रोगांमध्ये व्हॅव्ह्यूलर हार्ट डिसिज, कोरोनरी आर्टरी डिस्सेक्शन आणि ल्यूपूसशी संबंधित हृदयरोगांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत तरुण महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. २००६ मध्ये महिला हृदयरोग्यांची संख्या ७ लाख ६० हजार आणि पुरुषांची संख्या ५ लाख ८० हजार होती. ब्रिटनमधील प्रत्येक चारपैकी एक पुरुष आणि प्रत्येक सहा महिलांपैकी एका पुरुषाचा मृत्यू हा हृदयरोगामुळे होतो, असा अंदाज आहे. ब्रिटनमध्ये दरवर्षी १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू सर्क्युलेटरी सिस्टिम निकामी झाल्यामुळे होतो आणि त्यापैकी ९१,५५० महिला असतात, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

on - सोमवार, २२ एप्रिल, २०१३,
Filed under - आरोग्यवर्धिनी
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा