तोंड का लपविता?

नेहमी मी रस्त्याने जाताना बघते, प्रवासात बघते, तीनही ऋतूत अगदी पहाटे पाच-साडेपाचलासुद्धा बघते व खूप आश्‍चर्य वाटते. विचार करते व काही उत्तरे हाती लागतात व मग सर्वांनाच असे होत असेल का?हा प्रश्‍न पडतो व मग पहिलेच्या लोकांना हा त्रास नव्हता का? उत्तर येईल, तेव्हा प्रदूषण नव्हते. पण मग उन्हाळा तसाच होता ना? जाऊ द्या. मग मी माझ्याच मनाला पडलेल्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे ठरविले व लेखणी धरली.

आजकाल तुम्हाला माहीत आहे का? एक नवीन फॅशन आली आहे, तोंडाला रुमाल बांधणे. फक्त डोळे उघडे ठेवायचे. त्यामुळे एकमेकांचे चेहरे ओळखायलाच येत नाही. सहज विचारले तर आता उत्तर आले प्रदूषण खूप वाढले आहे. रुमाल बांधल्याशिवाय जमत नाही. प्रश्‍न पडतो, प्रदूषणाची झळ फक्त याच वयोगटातील लोकांना का? बाकी म्हातारी माणसे, मुले, पुरुषवर्ग, प्रौढ व इतर स्त्रिया यांना प्रदूषणाचा त्रास होत नसेल का? उत्तर मिळत नाही. त्यामुळे अनेक किस्से घडतात बघा.
दोन मैत्रिणी गाडीवरून चालल्या असतात. दोघींच्याही तोंडाला रुमाल असतो. मस्त मजेत जात असतात.समोरून दोन माणसे येत असतात.त्यातली एक मुलगी आपल्या वडिलांना ओळखते व गाडीवरूनच ती हात दाखवते व पुढे जाते.ज्याला हात दाखवते तो आपल्या मित्रास म्हणतो, ‘‘अरे बघ, त्या मुलीने मला हात दाखवला म्हणजे मी आजही तरुणच आहे.’’ मित्र म्हणतो, ‘‘तू तिला ओळखले नाहीस. जिने तुला हात दाखविला ती तुझीच मुलगी होती!’’ वडील डोक्यावर हात मारतात.
अनेक गरजू महिला आहेत. ज्यांना रुमाल बांधणे आवश्यक आहे. पांढरे डाग असणार्‍यांनापण उन्हाचा त्रास होतो, पण त्यांचेही प्रमाण कमी दिसते व त्याही रुमाल बांधत नाही. पण फॅशन या नावाखाली तरुणी फडके बांधतात. ते अनुत्तरितच. असेल काही त्यांचा हेतू. काय सांगावे? कोणती फॅशन येईल याचा विचार न केलेलाच बरा व मग प्रश्‍न निर्माण होतो. प्रदूषणाची झळ फक्त यांनाच का? रस्त्यावरील माणसे, पोलिस बघतच राहतात. नेमके कोण हे लक्षात येत नाही. या नावाखाली अनेक मित्र-मैत्रिणी भेटणे, गप्पा रंगणे व मग आपल्याला कोणी ओळखत नाही याचा आनंद. १०० टक्के लोकांना त्रास आहे. पण मग ९० टक्के मुलींचे प्रमाण जास्त आहे. खरेच मग पुढे काय? काय होणार या देशाचे? कारण त्रासाचे असेल तर इतकी नाजूक पिढी तयार होणार, तर देशाचे हित कसे जोपासले जाईल? ‘कणखर देशा, पवित्र देशा’ ही वाक्ये मागेच पडणार. तोंड का लपवतात? खरे तर चेहरा सौंदर्याचे लक्षण. चांगल्या चेहर्‍याला कुरूप का बनवता? त्यांना शरीरशास्त्र विज्ञानाची जाण नाही का? करकचून बांधल्यामुळे मान वळविणे कठीण जाते. यामुळे अपघातदेखील झाले आहेत. पालक सांगतात, मुले कॉमेन्टस् करतात ते टाळण्यासाठी बांधतात. पण खरे आज मुलांना ती मुलगी, घराणे, फोन नंबर, तिच्या गाडीचा नंबर, मैत्रीण याची सगळी माहिती असते. बांधले किंवा नाही बांधले तरी द्यायचा तो त्रास देतातच ते. कधी वाटेत लाज वाटणारी कामही होत असतील, कोणी बघू नये हाही उद्देश असेल.
आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करणार्‍या, समान हक्क मागणार्‍या या तरुणी अशा चिडीमारांना घाबरून जर फडके बांधत असतील, तर त्याच घाबरट आहेत. जशास तसे वागले पाहिजे, सडेतोड उत्तरे दिली पाहिजे. आज ती हे स्वसंरक्षणासाठी करू शकते. कबूल आहे, उन्हाच्या झळा लागत असतील कदाचित.दोन महिने विश्‍वामित्राचे ऊन, उन्हाळ्याचे दिवस, प्रकृती ठीक नसेल तर मान्य. पण कधी अतिरेक होतो. लोक, समाज, निसर्गप्रेमी जे सतत झटत असतात. त्यांच्या प्रयत्नांनासुद्धा चिल्लर वाटायला लागेल. काही लोक प्रदूषणमुक्तीसाठी झटत असतात. हिरवळीसाठी यवतमाळ शहर चांगले म्हणून गणना आहे. भारतात नागपूर शहराला पुरस्कार मिळाला होता व इथेच अशा फडके बांधणार्‍या व्यक्तींची संख्या जास्त आहे.जशा आहे तशा सामोरे जा. सतत नाकपुड्यांवर रुमाल बांधणे श्‍वासाला त्रास होतो. नाकपुड्यांनी श्‍वास घेणे आवश्यक आहे. म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या त्याचे दुष्परिणाम होतात. तोंडाने श्‍वास घ्यावा लागेल तर ते घातक आहे. डोळ्यांवर फक्त सतत ताण येतो. रुमालातच लक्ष असतं. नीट हालचाली होत नाही, नसा आवळल्याने दबल्या जातात. रक्ताभिसरण होत नाही, घाम जमा होतो, घाबरल्यासारखे वाटते, असेही चित्र दिसते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समाजावर विश्‍वास नाही. सुरूपता असून कुरूपता दाखविणे.सगळ्या शहरांमध्ये एवढी कुरूपता का? सर्वसाधारण चित्राचा विचार करता काहीतरी आडकाठी हवी. अर्थात हे प्रत्येकाचे बांधणे, स्वत:चे मत, चांगले काय वाईट काय? किती आवश्यक किती घातक, याचा विचार शेवटी ज्याचा त्याने करायचा, नाही का?
मला प्रश्‍नच आहे, तोंड का लपविता?
कल्पना पांडे, यवतमाळ

✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, १९ मे, २०१३,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS