भारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ!

•चौफेर : अमर पुराणिक•

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात याचा भारताच्या विकासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनात राजकीय तमाशा दिसतोय. योगदिनाबाबत काँग्रेस नेते वाट्टेल तसे स्वैर आरोप करत सुटले आहेत. भारताला मिळालेल्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ उठला आहे हेच यातून ध्वनीत होते.

विश्व-गुरु भारताने २१ जून रोजी इतिहास रचला. राजपथवर ३९ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योगसाधना करुन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधानांनी राजपथावरून घोषणा केली की योगसाधना मानवकल्याणासाठी, तणामुक्त विश्‍वरचनेसाठी हा उपक्रम जगभर राबवला जातोय तसेच प्रेम, शांती आणि सद्भावना संदेशाच्या प्रसारासाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वपुर्ण ठरणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, चीन, हॉंगकॉंग, सिंगापूर, थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स आदी अनेक देशांसह पाकिस्तान वगळता जवळ-जवळ संपुर्ण जगाने योगदिन साजरा केला. संयुक्त राष्ट्रसंघातही योगदिन आयोजित करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी, हा पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन असला, तरी यामुळे जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले आहे. जगाला ही आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मी स्वत:देखील प्रचंड उत्साहित आहे, असे बान की मून म्हणाले. जगभरात किमान दोन अब्ज लोक योगदिन सोहळ्यात सहभागी झाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात याचा भारताच्या विकासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनात राजकीय तमाशा दिसतोय. योगदिनाबाबत काँग्रेस नेते वाट्टेलतसे स्वैर आरोप करत सुटले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने आयोजित केलेला योगदिनाचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ तमाशा आणि ढोंग असल्याची मुक्ताफळे सतत वादग्रस्त वक्तव्यं करणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी उधळली आहे. भारताच्या नेतृत्वाखाली जगभर साजरा झालेल्या योगदिनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही विदेशात गेले. त्यांना भारताच्या या उपक्रमाशी काहीही देणेघेणे नाही, असेच यातून ध्वनीत होते. भारताचा होणारा सन्मान बहूदा सोनिया गांधींना पहायचा नसावा किंवा बघण्याची इच्छा नसावी. कॉंग्रेस नेत्यांना ही पैशाची उधळपट्‌टी वाटली. दिग्विजय सिंह यांनी हा कार्यक्रम म्हणजे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चमकवण्याचा उद्योग आहे, असे ट्वीट केले आहे.
विरोधकांना आता कोणत्याबाबतीत राजकारण करावे याचे काही भान राहिलेले दिसत नाही. काही प्रसिद्धी माध्यमांनाही याचे भान राहिलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्याचेही काही विचारवंतांना पचलेले दिसत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या भूमिकेचे जगभरातून मोठ्‌याप्रमाणात स्वागत झाले असताना या विचारवंतांना याची पोटदूखी का झाली याचे कारण समजेनासे झाले आहे. त्यांना योग म्हणजे केवळ मनशांती आणि काही जुजबी आजारांपासून निवृत्ती इतकीच मर्यादित संकल्पना मान्य आहे. यापाठीमागची मोदी यांची विशेषत: भारताची भूमिका सखोलपणे पहाण्याची इच्छा दिसत नाही. योगदिन म्हणजे केवळ क्रियात्मक योग किंवा अध्यात्मिक कृती म्हणून न पाहता यापलिकडे पाहण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनी याच आधारावर भारताची ओळख जगभर निर्माण केली होती. बंधूभावाचा संदेश जगभर दिला होता आणि भारताच्या संस्कृतीची आणि वैश्‍विक बंधूभावाची ओळख जगाला स्वामी विवेकानंदांनी करुन दिली होती. वैश्‍विक बंधूभावाच्या संकल्पनेचा पत्ताही त्यावेळी पाश्‍चिमात्य देशांना नव्हता. जगाने भारताकडे सन्मानाने पहायला तेव्हापासून सुरुवात केली. भारतीय संस्कृती समजून घेण्याचा संपुर्ण जगाने प्रयत्न तेव्हापासून सुरु केला, हे आपले तथाकथित विचारवंत विसरताहेत.
योगदिन साजरा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका केवळ आध्यात्मिक किंवा योगिकच नाही तर यात आंतरराष्ट्रीय समन्वय, पर्यावरण, व्यापार, सामरिक नीती आदी अनेक पैलूंचा समावेश आहे. यात केवळ आंतरराष्ट्रीय नीतीचाच भाग नसून योगाला जी सरकारी मान्यता मिळत आहे यातून प्रत्येक भारतीयाची आत्मिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती साध्य व्हायला मदत होणार आहे. भारताच्या विकासात या गोष्टी फार महत्त्वपुर्ण ठरणार आहेत, हे टीकाकार मंडळी आणि काँग्रेस नेते विसरत आहेत. भारतीयांची मानसिकता बदलून सकारात्मक आणि विकासाभिमुख नागरिक निर्माण करण्यात योग साधनेचा मोठा वाटा असणार आहे. भारतातील अनेक संत-महंतांनी अनेक शतकांपासून यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. योगाची देखील राष्ट्रोत्थानात मोठी भूमिका आहे. आजच्या काळातही श्रीश्री रविशंकरजी, बाबा रामदेव, माता अमृतानंदमयी आदि आधुनिक संतांनी यातून शारिरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्य देखील सदृढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
योगाच्या व्यापक स्वरूपाचे आकलन न करताच ही काँग्रेसची नेते मंडळी आणि माध्यमातील काही विचारवंत केवळ धार्मिक अंग रंगवण्यातच गुंतले आहेत. आंतराष्ट्रीय योग दिनाची घोषणा झाल्यापासून यावर अनावश्यक वाद आणि चर्चा सुरु आहेत. भारतातील अनेक मुस्लिम नागरिक नियमित योग साधना करतात आणि रामदेव बाबांच्या शिबीरांमुळे मुस्लिम समाजात योग साधनेबद्दल मोठी जागृकता निर्माण झाली आहे, हे या तथाकथित सेक्युलर विचारवंतांना पहावत नाही. त्यामुळे यावर अनावश्यक वाद निर्माण करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे.
एकूणच काय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार जे काही करेल त्याचा रेटून विरोध करायचा इतकीच यांची भूमिका दिसते. पण विरोधाला विरोध ही भूमिका सामान्य जनतेलाही कळतेय. भारताला मिळलेल्या या वैश्‍विक सन्मानाचा पोटशूळ काँग्रेसला का उठला आहे? हा प्रश्‍न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. आता अनेक कॉंग्रेस नेते योगदिनाच्या या भव्य कार्यक्रमानंतर त्याचा काय उपयोग असा खोचक प्रश्‍न उपस्थित करत आहेत. त्यांना स्वच्छता अभियान आणि योग दिन हे दोन्हीही उपक्रम मुर्खपणाचे वाटताहेत. राष्ट्रीय स्थरावर याचे परिणाम दिसायला कदाचित उशीर लागेल पण आंतरराष्ट्रीय स्थरावर मात्र याचे परिणाम लवकरच दिसू लागतील.
✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, २८ जून, २०१५,
Filed under - , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS