भारताला पारंपरिक उपचारांचा समृद्ध इतिहास
गांधीनगर, (१७ ऑगस्ट) – आयुर्वेद आणि योग यासारख्या पारंपरिक उपचारांचा समृद्ध इतिहास भारताला लाभला आहे. ही प्राचीन उपचार पद्धती देशाच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी गुरुवारी केले. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू झालेल्या जी-२० आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा एक भाग म्हणून गांधीनगर येथे डब्ल्यूएचओच्या पारंपरिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, भारतात आयुर्वेदाद्वारे पारंपरिक उपचाराचा समृद्ध इतिहास आहे. यात योगाचा समावेश आहे. ही उपचार पद्धतीत वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. याप्रसंगी डॉ. घेब्रेयेसूस यांनी आयुष्मान भारत योजनेद्वारे सर्वांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. बुधवारी त्यांनी गांधीनगर येथील आयुष्मान भारत वेलनेस सेंटरला भेट दिली. डॉ. घेब्रेयेसूस यांनी सहभागींना विज्ञान आणि नवकल्पनाद्वारे पारंपरिक औषधांची क्षमता विस्तारण्यासाठी जागतिक चळवळीसाठी प्रारंभ बिंदू म्हणून या कार्यक‘माचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पारंपरिक उपचार पद्धती ही भूतकाळातील गोष्ट नाही, कारण देश, समाज आणि संस्कृतींमध्ये त्याची मागणी वाढत आहे.
गुरुवारी डॉ. घेब्रेयेसूस ‘वन अर्थ वन हेल्थ-अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया २०२३’ परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले. यात जवळपास ७० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, मी इथिओपियामध्ये विद्यार्थी असताना त्यांच्या भारतीय शिक्षकांकडून प्रथमच आयुर्वेदाबद्दल ऐकले. याप्रसंगी, त्यांनी भारताने टेलिमेडिसिनचा अवलंब करण्यावर प्रकाश टाकला. यामुळे केवळ आरोग्य सेवा वितरणाचा विस्तार होत नाही, तर रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचतो, असे ते म्हणाले.

on - गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३,
Filed under - आरोग्यवर्धिनी
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा