पंतप्रधान मोदींचे १४० कोटी देशवासीयांना पत्र
नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती मोदी यांनी पत्राद्वारे दिली.
पंतप्रधान मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, तुम्ही मला साथ देऊन आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या १४० कोटी लोकांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा विश्वास, सहकार्य आणि पाठिंब्याचे हे मजबूत नाते माझ्यासाठी किती खास आहे, हे शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल ही आमच्या सरकारची गेल्या १० वर्षांतील सर्वांत मोठी संपत्ती आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रत्येक धोरण व निर्णयाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे अर्थपूर्ण परिणाम आपल्यासमोर आहेत.
वीज आणि गॅसची व्यवस्था केली
प्रधानमंत्री आवास योजनेतून कायमस्वरूपी घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि गॅसची योग्य व्यवस्था, आयुष्मान भारत योजनेतून उपचार, शेतकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेतून माता-भगिनींना मदत, असे अनेक प्रयत्न माझ्या सरकारने केले. तुमचा विश्वास माझ्या पाठीशी असल्यामुळेच यशस्वी होऊ शकले, असे पंतप्रधान पत्रात म्हणाले.
पायाभूत सुविधांची निर्मिती केली
भारत विकास आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. गेल्या दशकात पायाभूत सुविधांच्या अभूतपूर्व बांधकामाचा साक्षीदार मी आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि वारशाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार होण्याचा मानही आपल्याला मिळाला. आज प्रत्येक देशवासीयाला अभिमान आहे की, देश आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपत पुढे जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा