ट्रायने सिमकार्डविषयी बदलला नियम!
नवी दिल्ली, (१७ मार्च) – आपल्या मोबाईलमध्ये नवनवे सिमकार्ड, गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि कमी किमतीचा टॉकटाईम घेऊन, तात्पुरत्या वापरासाठी सिमकार्ड घेणार्यांना आता आळा बसणार आहे. ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटर ऑथरिटी ऑफ इंडियाने नवी नियमावली जारी केली आहे. शुक्रवार १५ मार्च रोजी ही नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नवे नियम येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. सायबर फसवणूक, ऑनलाईन ठगबाजी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच, सर्वसामान्य नागरिकांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी ट्रायने हे नियम तयार केले आहेत. यासंदर्भातील माहिती ट्रायने एक्सवर पोस्ट करून दिली आहे.
त्यानुसार, वापरकर्त्याने एकदा आपलं सिमकार्ड स्वॅप केलं तर तो लगेच पुन्हा आपला नंबर पोर्ट करू शकणार नाही. पुन्हा नंबर पोर्ट करण्यासाठी त्याला किमान ७ दिवस थांबावं लागणार आहे. सिम स्वॅप म्हणजे सिमकार्ड हरविले किंवा तुटले तर वापरकर्त्याला नवीन सिमकार्ड द्यावं लागतं. नंतर तो आपल्या फोनमध्ये जुन्याच नंबरचा वापर करू शकतात. ओटीपी, मॅसेज आणि फोनकॉलची सुविधा वापरता येते. ट्रायच्या नव्या नियमांमुळे सायबर गुन्हेगारीला आळा बसणार आहे. सायबर क्रिमिनल्स सिम स्वॅप करून, सामान्य ग्राहकांना लाखो रुपयांनी फसवतात. कारण, सिम स्वॅपिंगमुळे एका व्यक्तीच्या फोनवर येणारे कॉल्स आणि मॅसेजेस दुसर्या नंबरवर वळते केले जातात. सिम स्वॅपिंग म्हणजे नेमके काय? आपल्यासोबत काय घडतंय? हे कळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या खात्यातील पैसे चोरीला गेलेले असतात.
ग्राहकाला आपल्या मोबाईलचे सिम स्वॅप झाले आहे, हे लवकर लक्षात येत नाही. त्यांच्या मोबाईलमधून थोड्या वेळासाठी नेटवर्क गेलेले असते. नेटवर्क येईल किंवा आपण नेटवर्कच्या बाहेर आलो आहोत, असा विचार करून तो थोडा वेळ वाट बघतो. तेवढ्या वेळात फसवणूक केली जाते. नव्या निर्णयासोबतच ट्रायने टेलिकॉम मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववे संशोधन २०२४) नियमितीकरण केले आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी विषयी हा सुधारीत कायदा लागू होणार आहे. सिम म्हणजे एसआयएम या शब्दाचा अर्थ सबस्क्राईबर आयडेंटीटी मॉड्यूल असून ही एक लहानशी चिप असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा