विदेशात फिरायला जाणाऱ्यांना दुसरे कामच काय?
मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी ते रात्रंदिवस काम करतात. अशा नेत्याला बदनाम करण्याचे काम सतत विदेशात सुट्या घालविण्यासाठी जाणारे काही नेते करीत असतात. असा बोचरा टोला मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना लगावला.
पावणे दोन वर्षांत घेतले सामान्यांच्या हिताचे निर्णय
राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत मंत्रिमंडळ बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून, त्यात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून, ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, दीपक केसरकर, संजय बनसोडे उपस्थित होते.
आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय सुमारे ५० ते ६० मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये घेतले आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची शासनाची पहिलेपासूनच भूमिका आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

on - रविवार, १७ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा