लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक

नवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले.
राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा द्यावी लागेल. सध्या ते शक्य होणार नाही. राज्यातील प्रशासकीय यंत्रणेने याबाबत असमर्थता दर्शवल्याने लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील, असे राजीवकुमार म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. तिथे सहा वर्षांपासून विधानसभा निवडणुका झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याचा निर्देश निवडणूक आयोगाला दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा