निवडणूक रोख्यांचे तपशील आयोगाकडे सादर

– सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँकेची कृती,
नवी दिल्ली, (१२ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी सायंकाळी सादर केले. हे तपशील संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील.
या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून, ते लवकरच सादर केले जाईल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचा आदेश स्टेट बँकेला दिला होता. ही मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका स्टेट बँकेने दाखल केली होती, त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्टेट बँकेची कानउघाडणी केली आणि हे तपशील मंगळवारीच सादर करण्याचा आदेश दिला. त्यानंतर स्टेट बँकेने तातडीने हे तपशील मुख्य निवडणूक आयोगाला सादर केले आहेत.
न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याच्या मनःस्थितीत आम्ही नाही. आम्ही सांगू इच्छितो की, या आदेशात दिलेल्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाले, तर तसा निर्णय आम्हाला घ्यावा लागले, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. निवडणूक रोख्यांची माहिती स्वतंत्रपणे ठेवलेली आहे. ती गोळा करण्यात, त्याची तपासणी करण्यात आणि गोपनीयता राखण्यात वेळ लागू शकतो, त्यामुळे ही माहिती संकलित करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी स्टेट बँकेने केली होती. स्टेट बँकेने मागितलेल्या मुदतवाढीच्या काळात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या असत्या. यावर न्यायालयाने स्टेट बँकेला फटकारले. तुमच्याकडे मुंबई शाखेत ही माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त लिफाफे उघडून माहिती द्यायची आहे, अशा शब्दांत न्यायालयाने स्टेट बँकेला सुनावले.

on - मंगळवार, १२ मार्च, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा