केंद्र सरकारच्या दणक्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर परतले १० अॅप्स

नवी दिल्ली, (०३ मार्च) – प्ले स्टोअरवरून काही अॅप्स हटवण्याचा निर्णय गुगलने घेतला. या निर्णयाला सुरुवातीला काही स्टार्टअप्सचे सीईओ व संस्थापकांनी विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारने आक्षेप घेताच गुगलने काही तासांतच हटवलेले १० अॅप्स पुन्हा प्ले स्टोअरवर आणले. गुगलने प्ले स्टोअरवरून १० अॅप्स हटविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी आले होते. या अॅप्समध्ये शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम आणि ९९ एकर्स यासारख्या काही अॅप्सचा समावेश होता.
अॅप हटविण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कठोर भूमिका घेतली. अॅप हटविण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे त्यांनी गुगलला खडसावले. हा वाद सोडविण्यासाठी गुगलसोबत अॅप्सच्या मालकांची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीपूर्वीच गुगलने आपला निर्णय मागे घेतला. हे प्रकरण सेवा शुल्क न दिल्याचे होते. शुल्क न दिल्याने गुगलने प्ले स्टोअरवरून हे अॅप्स हटविण्याचा निर्णय घेतला. वास्तविक काही स्टार्टअप्सला गुगलप्रमाणे शुल्क आकारणी होऊ नये, असे वाटत होते आणि त्यांनी पैसे दिले नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
गुगलच्या या निर्णयावर कित्येकांनी टीका केली होती. कुकू एफएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी लालचंद बिशू यांनी एक्सवरील पोस्टमध्ये गुगलवर टीका करीत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. नोकरी डॉट कॉम आणि ९९ एकर्सचे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनीही पोस्ट करीत गुगलच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा