आव्हानांचा सामना करण्यासाठी सहमतीने वाटचाल आवश्यक

-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,

-कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप,
नागपूर, (११ जुन) – यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मर्यादा सोडून वक्तव्ये केली गेली. भारतासमोर अद्याप अनेक आव्हाने असल्याने पुढील वाटचाल अगदी संसदेतही सहमतीने व्हायला हवी, असे परखड भाष्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज केले.
संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा जाहीर समारोप आज रेशीमबाग मैदानावर झाला. छत्रपती संभाजी नगरातील बेट सराला येथील श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी महाराज हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह या वर्गाचे सर्वाधिकारी इकबालसिंग, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, निवडणूक झाली, निकाल लागला. सरकारने कामकाजही सुरू केले. चर्चा मात्र सुरूच आहे. लोकशाहीत निवडणूक आवश्यक प्रक्रिया आहे. त्यात दोन पक्ष व स्पर्धा असते. स्पर्धा असल्याने दुसर्‍याला मागे टाकून स्वत: पुढे जाण्याचे काम होतेच. पण, त्यातही एक मर्यादा असते. असत्याचा वापर नको. निवडणूक कशाला तर संसदेत निवडून जातील, तेथे बसून ते देश चालवतील, सहमतीने वाटचाल करीत, ही आपल्या देशाची परंपरा आहे. संसदेत दोन पक्ष यासाठी असतात की, दोन्ही पैलू पुढे यावेत. जे काम होणे आहे, ते पूर्णतः ठीक व्हावे, सहमती व्हावी. यातील स्पर्धा म्हणजे युद्ध नव्हे. पण, यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्याप्रकारे गोष्टी घडल्या, एकमेकांना लाथाडणे झाले, समाजात दुही होईल, मतभेद होतील, हे कुणी ध्यानातही घेतले नाही. संघासारख्या संघटनांनाही यात विनाकारण ओढले गेले. तंत्रज्ञानाचा आधार घेत नितांत असत्य बाबी पसरविण्यात आल्या. निवडणूक लढताना मर्यादेचे पालन झाले नाही. ते गरजेचे यासाठी होते की, देशापुढील समस्या अद्यापही संपलेल्या नाहीत. सर्वच क्षेत्रांत जगभरात आपण पुढे जात आहोत. याचा अर्थ हा नाही की आपण आव्हानांमधून मुक्त झालो.
ही आव्हाने सांगून सामाजिक समरसता व्यवहार, पर्यावरण बचाव, स्वआधारित व्यवहार, नियम- शिस्तपालन, कुटुंब प्रबोधन ही पंचसूत्री प्रत्येकाने अमलात आणण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. प्रारंभी वर्गात सहभागी देशभरातील शिक्षार्थींनी नियुद्ध, समता, दंड, व्यायाम योग, दंडयोग, योगासने आदींची प्रात्यक्षिके सादर केली. घोष पथकानेही वादन केले. सर्वाधिकारी इकबाल सिंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वर्गाचे कार्यवाह अशोक अग्रवाल यांनी वर्गाची माहिती दिली. राजेश लोया यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला उद्योगपती आनंद पिरामल, प्रणव जिंदाल, नाम फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक अभिनेते मल्हार पाटेकर, गणेश थोरात आदींसह अनेक महानुभाव उपस्थित होते.
मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष द्या
मणिपूर वर्षभरापासून शांतीच्या प्रतीक्षेत आहे. अचानक तेथे कलह निर्माण झाला किंवा केला गेला. आगीत तो अद्याप जळते आहे. त्राहीत्राही करीत आहे. याकडे लक्ष कोण देणार? याचा प्राधान्याने विचार करणे, हे कर्तव्य आहे. धनाढ्य घरांमधील महिला मद्य प्राशन करून कार चालवितात, लोकांना चिरडतात. आपली संस्कृती गेली कुठे, असा सवालही सरसंघचालकांनी यावेळी उपस्थित केला.
संस्कार संघातूनच : रामगिरी महाराज
कुठल्याही परिस्थितीत खंबीर पुरुष न्याय मार्ग सोडून अन्यत्र कुठेही जात नाही, असा संस्कार संघातूनच होतो. अनुकूल वा प्रतिकूल, सर्वच परिस्थितीत समर्पण भाव, सामाजिक समरसतेचे ज्ञान संघ परिवारात मिळते. संघाच्या सेवाकार्याने मी प्रभावित आहे. संघाचे आजचे व्यापक स्वरूप स्वयंसेवकांच्या त्याग, कर्तृत्व व समर्पण भावानेच हे शक्य झाले आहे, असे गौरवोद्गार श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

✎ Edit

Posted by - Admin,
on - मंगळवार, ११ जून, २०२४,
Filed under - , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS