विधानसभेसाठी बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार
मुंबई, (१९ जुन) – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जवळपास ९७ हजार बूथ, शक्तिकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक‘वारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रितरीत्या उतरणार असून, महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या ३० पदाधिकार्यांच्या बैठकीची माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागणार आहे. या बाबतची विस्तृत योजना गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आखली गेली. पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिका स्तरावरील नेत्यांना यथायोग्य जबाबदारी दिली जाणार आहे. महायुतीच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना कोअर कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात आली तसेच डबल इंजिन सरकारचा अधिकाधिक लाभ राज्यातील जनतेला कसा करून देता येईल याचीही चर्चा झाली.
२१ जुलै रोजी पुणे येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे या अधिवेशनाचा समारोप करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
माध्यमांना कानपिचक्या
गुरुवारी झालेल्या बैठकीत मित्रपक्षांबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा, टिप्पणी भाजपाच्या नेत्यांनी केली नसताना माध्यमांमधून चुकीच्या बातम्या देत महायुतीमध्ये जाणीवपूर्वक ठिणगी पाडण्याचे काम केले जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. बैठकीत झालेल्या चर्चेबाबत पक्षाकडून माहिती दिली जाते. जे घडलेच नाही ते घडल्याची बातमी देणे माध्यमांनी थांबवावे, अशी विनंती बावनकुळे यांनी केली.

on - शुक्रवार, १९ जुलै, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा