ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरांना आश्रय देण्यास उत्सुक
नवी दिल्ली, (२२ जुन) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसक आंदोलन करीत असलेल्या बांगलादेशातील घुसखोरांना आश्रय देण्यास इच्छुक आहेत, असा आरोप भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर शेजारी देशातील संकटात सापडलेल्या लोकांसाठी पश्चिम बंगाल दरवाजे खुले ठेवणार व त्यांना आश्रय दिला जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका सभेत जाहीर केले.
भारताची एकता व अखंडता कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे नेते बांगलादेशमध्ये छळलेल्या धार्मिक अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याला तीव्र विरोध करीत आहेत, परंतु घुसखोरांना मदत करून घुसखोरी न्यायसंगत असल्याचे कृतीतून दाखवत आहेत, असे प्रसाद यांनी नमूद केले.
अशा समस्या पूर्णपणे भारत सरकारच्या अधिकारात आहेत व १९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशींना आश्रय देण्याबाबत केंद्र सरकारनेच निर्णय घेतला होता, अशी आठवण प्रसाद यांनी करून दिली. ममता बॅनर्जी घुसखोरीचे समर्थन करीत पश्चिम बंगालची लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये तीन मुस्लिमबहुल जिल्हे होते; त्यांची संख्या नऊ झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. बांगलादेशातील लोकांचा ओघ कोलकात्यामध्ये येत असल्यामुळे कोलकात्याची लोकसंख्याही बदलत आहे आणि दहशतवादी प्रकरणातील अनेक आरोपींना राज्यात आश्रय मिळत आहे, असा दावा त्यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा