शेख हसीना समर्थक २९ नेत्यांची जाळून हत्या
ढाका, (०७ ऑगस्ट) – शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगला देशामध्ये हिंसाचाराचा आगडोंब सुरूच आहे. या हिंसाचारात मोठी जीवितहानी झाली आहे. शेख हसीना नेतृत्व करत असलेल्या अवामी लीगच्या २९ नेत्यांचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह मंगळवारी हिंसाचारग्रस्त भागात आढळून आले. यामुळे बांगलादेश हिंसाचारातील मृतांचा आकडा ४०० वर गेला आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून सोमवारी निघून गेल्यानंतर सातखीरा येथे झालेल्या हिंसाचारात किमान १० जण ठार झाले. अवामी लीग नेत्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली
कुमिल्लामध्ये जमावाच्या हल्ल्यात ११ ठार
कुमिल्ला शहरात जमावाने केलेल्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांचे तीन मजली घर पेटवून दिल्याने ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी घरात सापडलेल्या ११ मृतदेहांमध्ये ५ किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सोमवारी एका जमावाने शाह यांच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान काही लोक घराच्या तिसर्या मजल्यावर चढले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जमावाने घराच्या तळमजल्यावर आग लावली. त्यानंतर घराच्या तिसर्या मजल्यावर आश्रय घेतलेल्या लोकांचा धुरामुळे गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहे.
खासदाराच्या घराला आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू
दरम्यान, मंगळवारी शफीकूल इस्लाम शिमूल यांच्या घराला जमावाने आग लावल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह घरातील खोल्या, बाल्कनी आणि छतावर आढळून आले.
अवामी लीगच्या नेत्याच्या घरात सापडले ६ मृतदेह
येथील वृत्तानुसार, अवामी लीगची युवा शाखा जुबो लीगच्या दोन नेत्यांचे मृतदेह स्थानिकांना आढळून आले. त्यापैकी जुबा लीगचे नेते मुशफिकूर रहिम मृतदेह सोनागाझी उपजिल्हामधील एका पुलाखाली सापडला. बोग्रा येथे जमावाने जुबो लीगच्या दोन नेत्यांची हत्या केली. सोमवारी लालमोनिरहाट येथे जमावाने पेटवून दिलेल्या अवामी लीगचे जिल्हा संयुक्त सरचिटणीस सुमन खान यांच्या घरातून स्थानिकांना मृतदेह आढळून आले.

on - बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा