बांगलादेशात हिंसाचार; ३०० मृत्यू, हजारो जखमी
– भारताकडे मदतीची मागणी,
ढाका, (०५ ऑगस्ट) – बांगलादेशातील सरकारी नोकर्यांमधील आरक्षण संपुष्टात आणावे आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे आंदोलक आणि समर्थक यांच्यात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १४ पोलिसांसह सुमारे ३०० जणांना जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात हजारो लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच आंदोलन दडपण्यासाठी देशात इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. गोळीबारासोबतच महामार्ग आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत.
देशात विद्यार्थी असहकार अभियान राबवत आहेत. रविवारी किमान २० जिल्ह्यांमध्ये पोलिस दल आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. निदर्शकांना सतत निदर्शने करून पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव कायम ठेवायचा आहे. बांगलादेशातील देशव्यापी हिंसाचाराच्या संदर्भात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आंदोलक हे प्राणघातक निदर्शने का करत आहेत आणि ते त्यांच्या सरकारकडे काय मागणी करतात. वास्तविक, बांगलादेशात सरकारी नोकर्यांबाबत आरक्षण कायद्याची तरतूद आहे. बांगलादेशात ५६ टक्के सरकारी नोकर्या आरक्षण प्रणाली अंतर्गत राखीव आहेत. या नोकर्यांपैकी ३० टक्के आरक्षण हे १९७१ च्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी राखीव आहे. याशिवाय १० टक्के आरक्षण मागास प्रशासकीय जिल्ह्यांसाठी तर १० टक्के महिलांसाठी राखीव आहे. याशिवाय जातीय अल्पसंख्याक गटांसाठी पाच टक्के आणि अपंगांसाठी एक टक्के आरक्षण आहे.
त्यातही बांगलादेशातील आरक्षण प्रणालींमध्ये ३० टक्के आरक्षणाचा वाद आहे, जे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे. शेख हसीना सरकारला पाठिंबा देणार्यांना सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकर्या दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बांगलादेशात सरकारी नोकर्यांमध्ये ३० टक्के आरक्षणाच्या कोटा पद्धतीवरून गेल्या महिन्यात हिंसक निदर्शने सुरू झाली. निदर्शने तीव्र होत असताना, सर्वोच्च न्यायालयाने कोटा ५ टक्के केला, त्यापैकी ३ टक्के सैनिकांच्या नातेवाईकांना देण्यात आला.
बांग्लादेशमध्ये मृत्यूचा थैमान; भारताकडे मदतीची मागणी
बांगलादेशची राजधानी ढाकासह अनेक शहरे हिंसाचाराच्या विळख्यात आहेत. शेख हसीना सरकारने रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून देशव्यापी अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या सध्याच्या आंदोलनादरम्यान प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे. बांगलादेशातील निदर्शने आणि हिंसाचार पाहता भारत सरकारनेही तेथील नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत भारतीय नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यासोबतच सध्या बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याचा आणि आपत्कालीन फोन नंबरद्वारे ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी फोन नंबर जारी केले आहेत. हे क्रमांक +८८०१९५८३८३६७९, +८८०१९५८३८३६८०, +८८०१९३७४००५९१ आहेत. रविवारी राजधानी ढाकासह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले. रविवारी विद्यार्थी आंदोलकांची पोलिस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. राजधानी ढाकासह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीसारख्या घटना घडल्या आहेत.
आंदोलनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि स्टन ग्रेनेडचाही वापर केला. पंतप्रधान शेख हसीना यांच्यासाठी निदर्शने हे मोठे आव्हान बनले आहे. जानेवारीमध्ये शेख हसीना सलग चौथ्यांदा सत्तेत परतल्या. बांगलादेशवर १५ वर्षांहून अधिक काळ राज्य करत आहे. अशा स्थितीत हसीनाचे सरकार पडण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. सर्व विरोधक एकाच मागणीवर ठाम आहेत: शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. बांगलादेशातील विद्यार्थी संघटना सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाला विरोध करत आहेत. सरकारी नोकर्यांमधील कोटा रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील लोक गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला आता हिंसाचाराचे स्वरूप आले आहे.
हिंसाचारात ३२ ठार, अनेक जखमी
पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करीत ढाक्याच्या बाह्य भागात उग्र निदर्शन करणारे आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात ३२ जण ठार तर अनेक जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर सरकारने देशव्यापी जाहीर केली आहे. आज सकाळी सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या निदर्शकांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला, तेव्हा हाणामारी झाली.
आंदोलक आणि अवामी लीगच्या समर्थकांत मुन्शीगंज येथे झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार, तर ३० इतर जखमी झाले, असे वृत्त ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने दिले. या हिंसाचारादरम्यान काही स्फोट झाल्याचा दावा वृत्तात करण्यात आला. इतर ठिकाणीही हिंसाचारात काही लोकांचा मृत्यू झाला. आंदोलन करणार्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमारासोबतच अश्रुधूराचा माराही केला.
दरम्यान, ढाक्याच्या शाहबाग परिसरात हजारो विद्यार्थी व व्यावसायिक जमा झाले आणि त्यांनी सर्व बाजूंनी वाहतूक रोखून धरली. भेदभाव-विरोधी विद्यार्थी चळवळीच्या बॅनरखाली निदर्शकांनी पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच आरक्षणाच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय देण्याची मागणी करीत घोषणाबाजी केल्याचे वृत्त बीडीन्यूज २४ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मागील महिन्यापासून सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

on - सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा