राष्ट्र-साधनेची 100 वर्षे...
- भावना देखील एकच-देश प्रथम,
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. जेथे राष्ट्रभावना वेळोवेळी त्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नव-नव्या स्वरूपांमध्ये प्रकट होते त्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेची ही पुनर्स्थापना होती. या युगात संघ त्याच अनादि राष्ट्रभावनेचा पुण्यावतार आहे. आपल्याला संघाच्या शताब्दी वर्षासारखा उज्ज्वल प्रसंग पाहायला मिळतो आहे हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्यच आहे. मी या प्रसंगी देशसेवेच्या निश्चयाला वाहून घेतलेल्या कोट्यवधी स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो. तसेच मी संघाचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आदर्श असलेले परम पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शतकभराच्या गौरवपूर्ण प्रवासाची आठवण म्हणून भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणी देखील जारी केली आहेत.
ज्या पद्धतीने विशाल नद्यांच्या किनाऱ्यांवर मानवी संस्कृतीची जोपासना होते, त्याच पद्धतीने संघाच्या आधाराने देखील शेकडो आयुष्ये फुलली-फळली आहेत. ज्याप्रमाणे एक नदी ज्या ज्या मार्गांवरून वाहते त्या क्षेत्रांना स्वत:च्या पाण्याने समृद्ध करत जाते, त्याच पद्धतीने संघाने या देशातील प्रत्येक भागाला, समाजाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. जशी एक नदी अनेक प्रवाहांतून स्वतःचे रूप दाखवते, संघाची वाटचाल देखील तशीच आहे. संघाच्या वेगवेगळ्या संस्था सुद्धा जीवनाच्या प्रत्येक पैलूशी स्वत:ला जोडून घेऊन देशाची सेवा करतात. आपल्या समाजातील शिक्षण, कृषी, समाज कल्याण, आदिवासी कल्याण आणि महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये संघ अविरतपणे कार्य करत आला आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेचा उद्देश एकच आहे, भावना देखील एकच आहे आणि ती म्हणजे - देश सर्वप्रथम.
स्थापनेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश घडवण्याचे प्रचंड उद्दिष्ट निश्चित करून वाटचाल केली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघाने व्यक्तिनिर्माणातून राष्ट्र उभारणीचा मार्ग निवडला आणि या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी जी कामाची पद्धत निवडली ती म्हणजे नित्य-नेमाने शाखा भरवणे. संघाच्या शाखेचे मैदान, ही अशी एक प्रेरणादायक भूमी आहे जेथून प्रत्येक स्वयंसेवकाचा ‘अहम्पासून वयम्’च्या दिशेने प्रवास सुरू होतो. संघाच्या या शाखा म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवणाèया यज्ञ वेदी आहेत. देश उभारणीचा महान उद्देश, व्यक्ती घडवण्याचा सुस्पष्ट मार्ग आणि शाखेसारखी अत्यंत सोपी, सजीव कार्यपद्धत हेच घटक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आधारस्तंभ बनले. याच स्तंभांवर पाय घट्ट रोवून संघाने लाखो स्वयंसेवक घडवले आणि आज हे स्वयंसेवक विविध क्षेत्रांमध्ये देशाला पुढे घेऊन जात आहेत.
संघ जेव्हापासून अस्तित्वात आला, संघासाठी देश हेच प्राधान्य राहिले आहे, त्यासाठी तुरुंगवास देखील भोगला. स्वातंत्र्यलढ्यात संघाने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे रक्षण केले आहे, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. स्वातंत्र्यानंतरही, संघ राष्ट्रसाधनेत अखंड झटत राहिला. या प्रवासादरम्यान, संघाविरुद्ध कट कारस्थाने रचण्यात आली, संघाला नामशेष करण्याचे प्रयत्न करण्यात आले. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या परम पूज्य श्रीगुरुजींना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले. परंतु संघाच्या स्वयंसेवकांनी कधीही कटुता येऊ दिली नाही. कारण त्यांना माहीत आहे की आपण समाजापासून वेगळे नाही; समाज आपल्यापासूनच तर बनलेला आहे. समाजाशी एकरूपता आणि घटनात्मक संस्थांवरील विश्वास यामुळे संघाचे स्वयंसेवक प्रत्येक संकटात स्थितप्रज्ञ राहिले. समाजाप्रति संवेदनशील राहिले आहेत.
सुरुवातीपासूनच संघ देशभक्ती आणि सेवेचा पर्याय राहिला आहे. फाळणीच्या वेदनेमुळे लाखो कुटुंबे बेघर झाली तेव्हा स्वयंसेवकांनी निर्वासितांची सेवा केली. प्रत्येक आपत्तीमध्ये, संघाचे स्वयंसेवक आपल्या मर्यादित साधनसंपत्तीसह सर्वांत पुढे उभे राहिले. ही केवळ मदत नव्हती, तर ते राष्ट्राच्या आत्म्याला बळकटी देण्याचे कार्य होते. स्वत: त्रास सोसून इतरांचे दु:ख निवारण करणे ही प्रत्येक स्वयंसेवकाची ओळख आहे. आजही, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक सर्वांत आधी पोहचणाèयांपैकी एक असतात.
आपल्या 100 वर्षांच्या या प्रवासात, संघाने समाजातील विविध घटकांमध्ये आत्म-बोध जागवला, स्वाभिमान जागवला. संघाने देशातील दुर्गम भागातही काम केले आहे. संघ अनेक दशकांपासून आदिवासी परंपरा, आदिवासी रीतिरिवाज, आदिवासी मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात योगदान देत आहे. आपले कर्तव्य पार पाडत आहे. आज, सेवा भारती, विद्या भारती, एकल विद्यालय आणि वनवासी कल्याण आश्रम आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहेत. अनेक शतकांपासून समाजात रुजलेल्या कुप्रथा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ भेदभाव, ज्या वाईट पद्धती आहेत, त्या हिंदू समाजासाठी खूप मोठे आव्हान आहेत. ही एक गंभीर चिंता आहे ज्यावर संघ निरंतर काम करत आहे.
डॉक्टर साहेबांपासून ते आजपर्यंत, संघाच्या प्रत्येक महान व्यक्तीने, प्रत्येक सरसंघचालकाने, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आहे. परम पूजनीय श्रीगुरुजींनी ‘‘न हिंदू पतितो भवेत’’ या भावनेला सातत्याने प्रोत्साहन दिले. पूजनीय बाळासाहेब देवरस म्हणायचे, ‘जर अस्पृश्यता पाप नसेल, तर जगात कोणतेही पाप नाही!’’ सरसंघचालक म्हणून काम पाहिलेले पूजनीय रज्जूभय्या आणि पूजनीय सुदर्शनजी यांनी देखील ही भावना पुढे नेली. विद्यमान सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांनीही समरसतेसाठी, समाजासमोर एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमीचे स्पष्ट ध्येय ठेवले आहे.
जेव्हा 100 वर्षांपूर्वी संघ अस्तित्वात आला तेव्हा त्या काळातील गरजा आणि संघर्ष वेगळे होते. परंतु आज 100 वर्षांनंतर भारत विकसित होण्यासाठी वाटचाल करत असतानाची, आजच्या काळातील आव्हाने वेगळी आहेत, संघर्ष वेगळे आहेत. इतर देशांवरील आर्थिक अवलंबित्व, आपली एकता तोडण्याची कटकारस्थाने, लोकसंख्याशास्त्रीय बदलाची कारस्थाने या आव्हानांचे आपले सरकार वेगाने निराकरण करत आहे. मला आनंद आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक ठोस पथदर्शी आराखडा बनवला आहे.
आत्मबोध , सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण हे पाच संकल्प अर्थात संघाचे पंच परिवर्तन हे देशासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकासाठी एक विशाल प्रेरणा आहेत.
आत्मबोधाच्या भावनेचा उद्देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वत:ला मुक्त करणे आणि स्वत:च्या वारशाचा अभिमान बाळगणे, स्वदेशीचा मूलभूत संकल्प पुढे नेणे आहे. सामाजिक समरसतेतून वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय स्थापित करणे ही प्रतिज्ञा आहे. घुसखोरांमुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल झाल्याने आज आपल्या सामाजिक सौहार्दाला मोठे आव्हान भेडसावत आहे.
यावर उपाय म्हणून देशानेही लोकसंख्याशास्त्रीय मोहिमेची घोषणा केली आहे.
कौटुंबिक प्रबोधनाच्या माध्यमातून आपण कुटुंब संस्कृती आणि मूल्ये देखील मजबूत केली पाहिजेत. नागरी शिष्टाचारांच्या माध्यमातून आपण प्रत्येक नागरिकामध्ये नागरी कर्तव्याची भावना जागृत केली पाहिजे. या सर्वांसोबतच आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करून भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे. आपल्या या संकल्पांसह संघ आता पुढील शतकातील प्रवासाला सज्ज झाला आहे. 2047 च्या विकसित भारतासाठी संघाचे प्रत्येक योगदान राष्ट्राला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. पुन्हा एकदा, प्रत्येक स्वयंसेवकाला शुभेच्छा!

on - गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - रा. स्व. संघ , संवाद
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा