आयएनएस गरुडवर तैनात होणार ‘सीहॉक’

– भारतीय नौदलाची ताकद वाढणार,
नवी दिल्ली, (०४ मार्च) – कोची येथे भारतीय नौदल बुधवारी आयएनएस गरुड युद्धनौकेवर एमएच-६० आर सीहॉक मल्टिरोल हेलिकॉप्टर तैनात करणार आहे. ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची ही एक सामुद्री आवृत्ती आहे. संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. सीहॉक स्क्वाड्रनचा भारतीय नौदलात आयएनएस ३३४ च्या रूपात समावेश केला जाईल. सीहॉकची स्क्वाड्रन सहा हेलिकॉप्टरची असेल. हे हेलिकॉप्टर्स नौदलाला सोपविण्यात आले आहेत. नौदलाने आधुनिकीकरणासाठी २४ लॉकहीड मार्टिन-सिकोर्स्की एमएच-६०आर मल्टिरोल हेलिकॉप्टर चार वर्षांपूर्वी अमेरिकेकडून खरेदी केले होते. यातील सर्व हेलिकॉप्टर्स २०२५ पर्यंत मिळणार आहेत.
सीहॉक्सच्या समावेशासह भारतीय नौदलाने आपल्या क्षमतेत वाढ केली आहे. हेलिकॉप्टरचा पाणबुडीविरोधी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध व बचाव, वैद्यकीय मदतीसाठी वापर केला जाऊ शकतो, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मढवाल यांनी निवेदनात म्हटले. या हेलिकॉप्टर्सच्या भारतीय वातावरणात अत्यंत कठोर चाचण्या घेतल्या आणि आता त्याचा समावेश नौदलात करण्यात आला. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि एव्हियोनिक्स सूट भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजांसाठी सीहॉक्स आदर्श आहे. हे पारंपरिक आणि अमर्यादित धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, असे मढवाल यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा