मटार समोसे
सारण – पाऊण कप वाफवलेले मटार, ४ बटाटे उकडून कुस्करून, चवीनुसार मीठ (शक्यतो १ चमचा), २ टोमॅटो, १ मोठा कांदा + कोथंबीर एक मुठ + १ चमचा गरम मसाला + ४-५ मिरच्यांचे वाटण, १ टेबलस्पून तेल.
कृती – प्रथम एका कढई मध्ये तेल गरम करून घेणे त्यातच टोमॅटो चिरून घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. तेल सुटल्यावर त्यातच वाटण घालून परतावे. खरपूस भाजल्याचा खमंग वास सुटल्यावर गॅस बंद करावा व त्यात मटार, कुस्करलेले बटाटे, मीठ घालावे व सगळे नीट कालवावे.
मैदा, मीठ आणि सोडा एकत्र चोळावे. त्यात तूप घालून चांगले चोळावे, त्यातच मग दही घालावे व गरजेनुसार पाणी घालून मऊ पीठ भिजवावे. पाऊण तास हे मिश्रण झाकून ठेवावे. नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे पुरीसारखे करतो एवढे गोळे करून लाटून घ्यावे. प्रत्येक पुरीचे दोन भाग करावे. अर्ध्या भागाचा कोन करून त्यात सारण भरून तोंड बंद करावे. (समोसा बनवण्याचा छाप असल्यास काम आणखी सोपे.) नंतर तेलात बदामी रंगावर हे सामोसे तळावे. सॉस किंवा पुदीना चटणीसोबत सर्व करावे.
रवा केक
कृती: साखर ,दही आणि लोणी एका भांड्यात घेऊन फेसावे. त्यात रवा मिसळावा. एकजीव करून ३ तास झाकून ठेवावे. तीन तासांनी मिश्रणात , इनो आणि क्रश, मीठ मिसळावे. नोन स्टिक खोलगट तव्याला तूप लावावे. त्यात मिश्रण ओतावे. १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पाहावे.चिकटले नाही कि केक तयार झाला असे समजावे.
टीप: यामध्ये दुध वापरलेले नाही. त्यामुळे केक जास्त छान होतो. क्रश नको असेल तर वेलची पावडर वापरावी.
अष्टविनायक
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
मोरगांव
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
थेऊर
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
सिद्धटेक
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.
रांजणगाव
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
ओझर
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.
लेण्याद्री
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
महड
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.
पाली
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
विदर्भातील आठ गणपती
या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे – ( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.)
१. टेकडीचा गणपती, नागपूर शहर.
२. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर
३. अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर
४. भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा
५. सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा
६. सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा
७. चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ
८. वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.
सफरचंद हलवा
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावीत. kadhai मध्ये तूप तापत ठेवावे. gas बारीक ठेवावा.साले काढलेल्या सफरचंदांच्या फोडी करून बिया काढून घ्याव्यात. सफरचंदांच्या फोडी किसून घ्याव्यात .कीस लगेच तुपात घालून परतावा. याप्रमाणे सगळी सफरचंदे साले काढून किसून तुपावर परतावीत. एकदम सगळी सफरचंद किसाल्यास कीस काळा पडतो म्हणून थोडी थोडी किसून तुपावर टाकावीत. १० मिनिटे परतल्यावर त्यात साखर घालावी. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे साखर जरा विरघळली कि खवा घालावा. वेलची पावडर घालावी. आवडीनुसार बेदाणे,बदाम काप, काजू तुकडे घालावे.चांगले परतावे. बदामाच्या कापानी सजवावे. थंड किवा गरम आवडीनुसार सर्व्ह करावे. उपासाला चालतो . करून पहा.खरच testy लागतो.
आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ
वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.
त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात.
ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे.
जाण्याचा मार्ग : पुणे स्टेशन तसेच स्वारगेटहून आळंदीला जाण्यासाठी एसटी तसेच पीएमटीच्या बस उपलब्ध आहेत.
संक्रांतीचे वाण आणि वसा

आटपाट नगर होतं. नगराचा राजा प्रजेची सुखदु:खं जाणून घ्यायचा. एकदा नेहमीप्रमाणे राजा प्रधानजीला म्हणाला, ‘‘काय प्रधानजी, राज्यात सर्व कुशल मंगल आहे ना? काही खास खबर?’’
प्रधानजी- राजेसाहेब, तसे सर्व कुशलमंगल आहे. पण, आपल्या राज्यात अलीकडे मुलींचा दुष्काळ पडत आहे.
राजा- काय म्हणता प्रधानजी? मुलींचा दुष्काळ! अहो, अन्नाचा दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ समजू शकतो, पण मुलींचा दुष्काळ! डोकं ठिकाणावर आहे का तुमचं?
प्रधानजी- खरंच सांगता, राजेसाहेब. अहो, गावागावातून मुलींची संख्या इतकी कमी झाली की, भावांना ओवाळण्यासाठी, राखी बांधण्यासाठी बहिणी कमी पडतात, एवढंच नाही तर लग्नायोग्य मुलांना मुली मिळत नाही.
राजा- अरे बापरे! काय सांगताय् काय? प्रधानजी ही तर मोठीच समस्या आहे. मुलींची समस्या होणे यातून कितीतरी समस्या निर्माण होणार, समाजाचा समतोल बिघडणार, सामाजिक आरोग्य धोक्यात येईल… तेव्हा-
प्रधानजी- तेव्हा आता काय करायचे?
राजा- काय करायचे म्हणजे? आत्ताच्या आत्ता तुम्ही कामगिरीवर निघा. आपल्या राज्यात मुलींची संख्या एवढी कमी का झाली? याची कारणे शोधून काढा. राज्यात मुलींची संख्या वाढेल असे अभियान राबवा. निघा. निघा लवकर.
प्रधानजी- होय महाराज, मी तपास करून पाहतो. (प्रधानजी वेष बदलून निघाले. वाटेत एका घराजवळ थांबले. त्यांना आतून संवाद ऐकू आला.)
गीता- आलीस का वं सुमन? काय म्हंते तुई सून?
सुमन- आता सून का म्हननार हाय? आता नातवाची वाट पाहून राह्यलो. या वक्ती मले नातूच पायजे बाप्पा.
गीता- पन मले सांग सुमन, ते का आपल्या हातची गोस्ट हाय.
सुमन- आता हातचं नाही म्हून पोरीयांची गर्दी का करायची हाय? मी मायावाल्या सुनेला म्हनलं का तू बी तपासणी करून घे. पोरगी हाय का पोरगा हे समजते मने पह्यलेच. पोरगा आसन तर राहू दे नाहीतर…
गीता- नाहीतर सुमनताई, काय करनार आहात तुम्ही?
सुमन- काय करनार म्हंजे? आजपावतं तीन वेळा जे केलं तेच. पोट्टी नाय पायजेन बाप्पा. पोरगी असंन तर जलमायच्या अगोदरच…
गीता- बस्स बस्स झालं आता सुमन. अग, तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेस, हे कसं विसरतेस? असा निष्ठुरपणा करायला तुला काहीच कसं वाटत नाही?
सुमन- आता मले का वाटनार हाय? आपल्या घरादाराला वारस पायजे. वंशाला दिवा पायजे हे खोटं हाय का?
गीता- वंशाचा दिवा, वंशाचा दिवा मनता मनता तुम्ही हे काय चालवलं आहे? आता मात्र मी तुझ्या सुनेच्या पाठीशी आहे. मी हे मुळीच खपवून घेणार नाही. बिचारी पुष्पा. सतत तिच्यावर जबरदस्ती करून तुम्ही तिची तब्येत किती खराब करून टाकली आहे.
सुमन- तिच्या तब्येतीले का धाड भरली हाय? चांगले खाते पेते अन् पसरते.
गीता- असं कसं म्हणते सुमनबाई, अगं येणारं बाळ हे मुलगा असो की मुलगी असो, आईला सारख्याच वेदना सहन कराव्या लागणार नाही का? अगं येणारं बाळ हे निरोगी, योग्य वजनाचं, सुदृढ व्हावं म्हणून गर्भवती स्त्रीने सकस पोषक आहार घ्यायलाच हवा. तसेच अशा अवस्थेत खूप अवजड काम करू नये. जरा विश्रांतीही घ्यावी. मीच सांगितलं तुझ्या सुनेला तसं.
सुमन- हो वं गीता मोठ्ठ्या डागदरनीवानी तू बी सांगून राह्यली.
गीता- अग बाई बरं आठवलं. आपल्या गावातल्या डॉक्टर मॅडम येणार आहेत तिळगूळ समारंभाला, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला, चल ना तू पण. गावातल्या सगळ्या बायकांना बोलावलं आहे.
सुमन- चाल बाई चाल. डाक्टरीनबाईची भेट बी होईन. चाल ना चाल.
(दोघीही जातात.)
डॉक्टर- नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही. मला दवाखान्यातून निघायला जरा उशीरच झाला.
गीता- तुम्ही आमच्यासाठी वे काढून आल्या हे आमचं भाग्यच.
डॉक्टर- तसं काही नाही. आज संक्रांतीच्या तिळगूळ समारंभाच्या निमित्ताने तुमच्याशी भेटायला बोलायला मला खूप आवडेल.
काय सुमनबाई, काय म्हणते तुमची सून?
सुमन- आता सून काय म्हननार हाय. एक-दोन दिवसात घेऊनच येतो तिले दवाखान्यात.
डॉक्टर- जरूर या. फार गुणी आहे तुमची सून.
सुमन- व्हय व्हय, पण तिच्यावानी नातू बी व्हायला पायजेन नाई का? तुमच्या वाल्या दवाखान्यात आन् नातू होनार की न्हाई सांगजा बाप्पा.
डॉक्टर- अहो सुमनताई, आम्ही पेशंटच्या ज्या काही टेस्ट करतो त्या काही प्रॉब्लेम तर नाही हे बघण्यासाठी.बाळाची वाढ नीट होतेय् की नाही हे पाहण्यासाठी.
गीता- पहा ना मॅडम, मी नेहमीच सुमनबाईला या बाबत सांगत असते. गर्भलिंग परीक्षा म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे पाहणे म्हणजे गुन्हा करणे होय असे ऐकले आहे.
डॉक्टर- अगदी बरोबर आहे. हे बघा भगिनींनो, आजकाल लोक गर्भलिंग परीक्षा करून मुलगी असेल तर तिला जन्मालाच येऊ देत नाही. यामुळे मुलींचा जन्मदर सगळीकडेच कमी झाला आहे म्हणून आपल्या सरकारने कायदाच केला आहे.
सुमन- कायदा? कायचा कायदा जी आमाला सांगा ना.
डॉक्टर- गर्भलिंग परीक्षा करावयास भाग पाडणारे कुटुंबीय आणि प्रत्यक्ष गर्भलिंग परीक्षा ही टेस्ट करणारी व्यक्ती म्हणजे वैद्यकीय अधिकारी यांना कायद्यानुसार सजा आणि दंड देण्याची तरतूद आहे.
गीता- हो ना डॉक्टर मॅडम, टीव्ही आणि पेपरमधून खूप दाखवले जाते याबद्दल.
डॉक्टर- खरंच गीताबाई, तुम्ही खूप जागरूक आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु, या बाबत संपूर्ण गावात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. हे बघा भगिनींनो, आपल्या राज्यातील मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे ही एक फार मोठी सामाजिक समस्या आहे. मुली नको म्हणून त्यांना जन्मालाच येऊ द्यायचे नाही ही प्रवृत्ती समाजात वाढत आहे. म्हणूनच सरकारने आता गर्भलिंग परीक्षेवर कायद्याने बंदी घातली आहे. समाजात मुलींची संख्या कमी होणे ही फार भीषण समस्या आहे. समाजातील मुलींची, स्त्रियांची संख्या कमी झाली तर समाजात अनाचार, अत्याचार वाढेल. तुम्ही सर्व भगिनी हे लक्षात का घेत नाही?
सुमन- खरं हाय डाक्टरीनबाई आत्ता माह्या डोस्क्यात परकाश पडला.
डॉक्टर- नुसता प्रकाश पडून चालणार नाही आता सर्वांनी आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून घ्यायचे आहे.‘लेक वाचवा, लेक वाचवा’ हे अभियान राबवायचे आहे. राजाज्ञाच आहे तशी.
राज्यात सर्वत्र मुलींचा जन्मदर कसा वाढेल या बाबत उपाययोजना सुरू झाल्या. कळदीकुंकवाच्या कार्यक्रमात बायका म्हणू लागल्या.
संक्रांतीत मिळाला काटेरी हलवा
अहो लेक वाचवा, तुम्ही लेक वाचवा.
समाजातील सर्वच स्तरावर लेकींना, मुलींना वाचवण्यासाठी अभियान सुरू झाले. म्हणूनच बायांनो, मायभगिनींनो लेकींवर प्रेम करा. त्यांचा गळा घोटू नका. भगिनींनो आपल्या लेकींंना वाचवा, फुलवा पण कळ्या असतानाच खुडू नका. आपली लेक, मुलगी ही दोन घरांचा उद्धार करते.
रोशन करेगा बेटा तो एक कुलका
दो दो घर की लाज होती हैं बेटीयॉं
सगळीकडे नारे गुंजू लागले. मुलींचे महत्त्व आपण विसरलो आणि बाईच बाईच्या जिवावर उठली तेव्हा सखे-
जागव ग जागव समाजाला जागव
समाजासाठी आपल्या लेकीला वाचव
अशा या आपल्या मुली स्वत: मात्र
कॉटोकी राहपर खुद ही चलती रहेगी
औरोंके लिए फुल बोती हैं बेटियॉं
अशा प्रकारे आपण लेकींना वाचवले तर समाजाची सर्वच क्षेत्रे स्त्रियांच्या कर्तृत्वाने फुलतील. समाजात स्त्रीच्या जन्मामुळे नवे तेज आणि चैतन्य प्राप्त होते.संक्रांतीच्या संक्रमण पर्वावर समाजात विचारसंक्रमण व्हावे, यासाठी राजाने ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधी’ अभियान चालवले, समाजाने लेकींना वाचवण्याचा वसा घेतला, राजा प्रजेला म्हणाला, ‘‘ऊतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका.’’
लेकींना वाचविण्याचे अभियान यशस्वी करून कुटुंबातील लेकी, बहिणी, सासू, सुना सगळ्या सुखी झाल्या, आनंदी झाल्या. तसेच, आपल्याही घरात मुलींना सुखी होऊ द्या, आनंदी होऊ द्या. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो.
जयश्री देशकर
नागपूर
स्त्रीसत्ताक व्यवस्था ?

जासत्ताक भारताचा सहा दशकांचा कालावधी लोटल्यानंतर स्त्रीशक्तीची वाटचाल लक्षात घेता,जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेतलेली आहे,हे वास्तव असतानाही संसदेत, शासकीय-प्रशासकीय सेवा, पोलिस खाते इत्यादी महत्त्वपूर्ण सेवांमध्ये स्त्रियांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत फारच कमी (नगण्य) दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांनी महत्त्वपूर्ण अशी नेतृत्वसिद्ध भूमिका साकारली असताना, स्वातंत्र्यानंतर दिवसेंदिवस स्त्रियांची स्थिती खालावण्याचे कारण काय? याचा शोध घेत असताना जे विदारक चित्र समोर येते ते मन सुन्न करणारे आहे.
असं म्हणतात की, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. सतत परिवर्तन होणे हा जगावा नियम आहे. आजतागायत मानवाने केलेली प्रगती ही या परिवर्तनाचेच द्योतक आहे. परिवर्तन नसेल तर या जगाची अवस्था एका डबक्याप्रमाणे होईल, असेही काही तज्ज्ञमंडळी म्हणत असतात. मात्र, दुर्दैवाने परिवर्तनाचे वारे स्त्रीवादाच्या दिशेने वाहत असल्याचे कधीही दिसून आले नाही. सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांनी भरारी घेतली असली तरी पारंपारिक पुरूषप्रधान संस्कृती आणि मानसिकता आजही बदललेली नाही.
पुरुषी वर्चस्वाची भावना आणि त्यांची मानसिकता स्पष्ट करणारी घटना म्हणून दिल्लीतील भू-लेकीच्या घटनेकडे बघावे लागेल. एकविसाव्या शतकात जगत असताना आधुनिकीकरणाने सभोवतालचे सर्व जीवनक्षेत्र प्रभावित झाले आहे, त्यामुळे लिंगवाद, स्त्री-पुरुष वर्चस्व-श्रेष्ठत्व या भावनांना आपल्या समाजव्यवस्थेत स्थान राहणार नाही असे वाटत असतानाच भारतीय समाजाचे विकृत प्रतिबिंब अधोरेखित करणारी घटना घडली आणि संवेदनशील समाजमन नि:शब्द झाले. दिल्लीतील या घृणास्पद घटनेने समाजातील वास्तव मात्र बाहेर आणले. पुरुषी अहंकाराच्या प्रतिक्रिया सामान्य माणूस, राजकारणी ते मठाधीश यांच्यातर्फे व्यक्त झाल्यात. स्त्रियांनी लाचार होऊन क्षमा मागण्यापासून तर मर्यादा उल्लंघनामुळे घडलेली घटना असे वर्णन केल्या गेले.यातून अद्यापही पुरुषी वर्गावर पारंपरिकतेचे ओझे भक्कमपणे असल्याचे निदर्शनास आले. श्वेतकेतूच्या संहितेला प्रमाण मानणारी त्यांची वचने असल्याचे आढळलेभारतात तसेही ‘बोल बच्चन’गिरी करणार्यांची संख्या कमी नाही. कुधी, कुठे, काय बोलावे याचे जरा सुद्धा तारतम्य आपल्या राजकारण्यांना, प्रतिष्ठितांना राहिलेले नाही. याप्रकारच्या बेताल वक्तव्यांनी आपण काय सिद्ध करतोय याबाबत आत्मचिंतन करण्याची तीळमात्र सुद्धा गरज त्यांना वाटत नाही.
दुसर्या बाजूला आधुनिक साधने देखील स्त्री वर्गाचा विचार विक्रय वस्तू, वस्तुरूप, मादीरूप, उपभोग्य साधन या स्वरूपात तसेच बाजारपेठीय रचनेतून, करताना दिसतात. जाहिरातीचे क्षेत्र, चित्रपटसृष्टी व प्रभावी दृश्य साधने इत्यादींमधून स्त्री संदर्भातील दृष्टिकोन समताधिष्ठित नसून आकर्षण व उत्तेजकता याच रूपात मांडल्या जात आहे. एकविसाव्या शतकातही तिच्या वाट्याला आलेल्या वेदना, उपभोग आणि उपयोगितावादी या स्वरूपातच असल्याने भारतीय समाजव्यवस्थेतील हे लिंगभेदात्मक आव्हान लक्षात घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. माध्यमांद्वारे चालविला जाणारा स्त्री प्रतिमेचा तमाशा अत्यंत घृणास्पद असून, याकडे सामान्य जन देखील मनोरंजनाच्या दृष्टीने पाहतात, विशेष गंभीरतेने लक्ष देत नाही याचे देखील आश्चर्य वाटून जाते.
आज भारत महासत्ता होणार की नाही या संदर्भात सर्वंकष चर्चा केली जात आहे. मात्र, प्रभुत्वसंपन्नतेचा विचार करताना समाजातील अर्धा वाटा असणार्यांना अंधकारमय व्यवस्थेत लोटून विकासाचा विचार होऊ शकेल काय? या गृहीतकाला पुरुषी व्यवस्था अजीबात लक्षात घेत नाही, याचेच आश्चर्य वाटते. परंपरेचे स्तोम वा उदात्तीकरण करताना देवीशक्ती, मातृशक्ती, आदिशक्ती म्हणून गौरवायचे आणि प्रतिमापूजन करावयाचे, राष्ट्रीय संकल्पना मातृ या संकल्पनेत मांडायची व त्यावरच जाणीवपूर्वक प्रतिहल्ला करायचा या दुहेरी मापदंडामुळे समाजव्यवस्थेचे मूल्यच नामशेष होत आहे, याचे भान राखल्या जात नाही, ही चिंतेची बाब आहे.
भारतीय संविधानाने लिंगभेदाला नकार दिलेला असून, समताधिष्ठित व्यवस्थेत व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुषासाठी समान मूल्य असतील अशी घटनात्मक तरतूद केलेली आहे. प्रजासत्ताक भारताचे चित्र स्पष्ट करताना समानतेचे उद्दिष्ट अनुच्छेद १२ ते ३५ मध्ये स्पष्टपणे प्रतिपादित केलेले आहे. प्रजासत्ताकाचा मुळात अर्थच ‘लोकानुवर्ती शासन’ असा आहे. यामध्ये लोकअनुयाला जागा नसून ‘लोक अनुकंपा’ जपताना व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याची ग्वाही दिलेली आहे. मुख्यत्वे कमकुवत घटकांना आधिक्याने संरक्षण यामध्ये अभिप्रेत आहे. असे असतानाही स्त्री वर्गाकडे अथवा स्त्री प्रश्नांकडे लिंगात्मक भावनेने बघणे, कृती करणे, विचार करणे हाच घटनात्मक द्रोह आहे. भारताच्या प्रजासत्ताक व्यवस्थेत स्त्रिया स्त्रीसत्ताक व्हाव्यात असा आशावाद मांडून त्या संदर्भात वारंवार घटनात्मक तरतुदीही केल्यात. पंचायती व्यवस्थेने तर ५० टक्के महिलांना राजकीय क्षेत्रात सहभागाची संधी दिली व मोठ्या प्रमाणात स्त्रियांना निर्णयप्रक्रियेत आणले, परंतु त्याची दुसरी बाजू तितकीच भयावह आणि पुरुषी मनोविकृतीचा परिचय देणारी आहे. या प्रक्रियेत येणार्या महिलांविषयी चारित्र्य आणि पावित्र्यावरच शंका निर्माण करून कुटुंबव्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांच्या कार्यक्षमतेवर व त्यांच्या आवागमनावर जाणीवपूर्वक प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न हा पुरुषी वर्चस्वाचा कुटिल प्रयत्न दिसतो. या पार्श्वभूमीवर स्त्रीसत्ताक व्यवस्थेला आकार मिळू शकतो का? या प्रश्नासमोरच आव्हान उभे ठाकलेले आहे.
स्त्रीविषयक प्रश्नांची चिकित्सा करताना अद्यापही पुरुषांचा परंपरावादी दृष्टिकोन बदललेला नाही हे स्पष्ट करणार्या अनेक बाबी जनगणना अहवालातून आणि प्रसारमाध्यमांतून दिसत आहेत. पुरुषी मानसिकता जपणार्यांना स्त्रियांची उपस्थिती हवी आहे त्याच सोबत तिच्यावरील मर्यादाही हव्या आहेत. पुरुषी स्वभावाचे हे दुहेरी चित्र समाजातील अंतरकलहांना कारणीभूत आहे व यातच त्यांच्यातील रानटी व पशूलाही लाजवणारी विकृती अंतर्भूत आहे, हे पुरुष वर्गाने मान्य करायला हवे. दिल्ली घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरुष वर्गाच्या प्रबोधनाची गरज असल्याचे ठळकपणे समोर आले. विशेषत: राजकीय नेतृत्व, मठाधिश, तथाकथित राष्ट्रप्रेमी, समाजविश्लेषक यांच्या प्रबोधनाची मोहीम प्राधान्याने घेतल्यास स्त्रीसत्ताक व्यवस्थेकडे व महासत्तेकडे आपण वाटचाल करू शकू.
डॉ. अलका विनायक देशमुख
ऐकून तर बघा

बोलणं न ऐकणं म्हणजे दुसर्याचा अपमान, उपेक्षा, दुर्लक्ष, उद्दामपणा व माणुसकी नसलेलं वर्तन. एकमेकांचे बोलणे नीट ऐकून घेतल्या जात नाही म्हणून संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञांच्या मते लक्षपूर्वक ऐकणं, हा संबंध टिकविणे, यश मिळविणे याचा कणा आहे. जितका माणूस लक्षपूर्वक ऐकेल तितका तो सुखी होईल.
ऐकणे ही नुसती शारीरिक क्रिया मानल्या जात नाही. शारीरिकदृष्ट्या ऐकणं हे वेगळं, त्यामध्ये ऐकून न ऐकल्यासारखे केले जाते ते संबंध टिकत नाहीत. सुसंवाद होत नाही. बाहेर किंवा घरी ते संबंध टिकविण्यात अयशस्वी होतात. सर्वात महत्त्वाचे घटक कोणते हा विचार केला तर पती, पत्नी, मुलं, आईबाप, मुले व शिक्षक, मालक-मजूर हे महत्त्वाचे व अपरिहार्य संबंध आहेत व न तुटता येणारे आहेत. दीर्घकालीन आहे. अतिपरिचयाचे असतात, पण याच संबंधात तक्रारी सुरू असतात.
ऐकणं म्हणजे कानानेच ऐकायचे असे नाही. बोलण्याचा अर्थ काय आहे, हे कळणं म्हणजे जे बोलतो त्याकडे लक्ष द्यावे लागणार. आपले भाष्य करणे ऐकले जावे तेव्हा त्याचं मन त्यात असेलच असे नाही. बायको बोलते व नवरा हॉं, हूँ करतो. समजा एखादे पुस्तक वाचत असेल तेव्हा ती चिडते. पुस्तक ओढते व मग खोचक बोलते नाहीतर, थोडा धाक दाखवते. लक्ष द्या, नाहीतर बघा.
पेपर वाचीत असताना सामानाची लिस्ट ऐकणारा पती दुसरेच सामान आणतो. दुहेरी नुकसान. पत्नी चिडते, ‘विसराळू’ ही पदवी त्याला देते.
वर्गात शिक्षक जीव तोडून शिकवितात. मुले काहीतरी कारभार करतात. पण, मुलांचं न ऐकणं समजतं. काही मुले शिक्षकांकडे बघतात ती ऐकत नसतात, आपल्याच विश्वात गर्क असतात. काही अनुभवी व हुशार शिक्षक अशा मुलांना पकडतात. वर्गात लक्ष देणं हा महत्त्वाचा भाग, पण अशा क्रिया घडतच असतात. अडचणी निर्माण होतात. लक्ष दिले तर विषय समजून घेऊन शिकता येतो, ग्रहण करता येते. गाईड्स वापरणं, नोट्स वापरणं, ही पाठांतराची क्रिया होते, पण लक्ष देणं म्हणजे आत्मसात करता येते. स्मरणशक्ती वाढते. केवळ रागावूनच काम घेतले तरी होणार नाही, भीती निर्माण होते व काम नीट होत नाही. ऑफिसमधले कर्मचारी काळजीत असतात, पण काम करतात. मन मात्र चूप नसतं. संसार चालविणे या महत्त्वाच्या भागामुळे ते काम करतात. घरी लक्ष देऊ शकत नाही. मुले ऐकत नाही. मग काम करताना चिंता करतात. मुलांची चिंता असते, कधी ऑफिसमधले प्रश्न असतात. परिणाम असा होतो की, कामात लक्ष लागत नाही व कामात चुका होतात. मत्सर, ईर्ष्या, क्रोध, निराशा अशा भावना किंवा नुसतेच गृहीत धरणे, बेपर्वाई, अकर्तव्यदक्ष, वेळेचं महत्त्व न समजणं, टाळाटाळ करणे, वेळ काढून नेणे. यामुळे माणूस मनाने ऐकत नाही. फक्त कानाने ऐकतो व मग ऐकून न ऐकल्यासारखं करतो. कधी नकळतही होते, कधी मुद्दाम होते. मुलगा व पालक असेल तर पालक मागण्या पूर्ण करीत नाही म्हणून मुले ऐकत नाही. शिक्षक रागीट असेल तर विद्यार्थी ऐकत नाही. बॉस असेल तर कर्मचारी घाबरतात, मग काम नीट होत नाही. रागीट स्वरातील बोलणं ऐकणार्यापर्यंत पोहोचत नाही. फक्त कर्मचारी वाट पाहात कामात लक्ष घालत नाही. कोरडेपणाने बोलणी खातात, पण कमीपणा वाटत नाही. घरकामी स्त्रियांचे उदाहरण देता येईल. वादाचे कारण हेच एकमेकाला बोलू द्यायचं नाही व ऐकायचे नाही, वाद सुरू. भांडण संपत नाही व मग नीट न ऐकण्याने जीवनातल्या नात्यांना तडा जातो व राहावे तर सोबत लागते, पण मग मजा येत नाही. वैताग वाढतो, विचार बदलतात, दूर जाण्याचा विचार करतात, संबंध दुरावतात. आयुष्य हेच कठीण असतं. आपण त्याला खतपाणी घालून खडतर बनवितो. कटुत्व निर्माण होते, चिडचिड वाढते. हेवा, मत्सर यात वाढ होते. काम समजून घेणे, चुका झाल्या तर सुधारणे याची आवश्यकता वाटत नाही. वरिष्ठांकडून बोलणी खावी लागते. ज्यांची वृत्ती केवळ पोटार्थी आहे त्या माणसांना नीटनेटके काम करण्यात रस नसतो, अव्यवस्थित कामाने ऑफिसचे नुकसान होते. स्वत: बदलण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही, तेव्हा थोडे दोघांमध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण झाले तर बरे होईल. त्याकरिता काही गोष्टी लक्षात घ्याव्या.
१) दुसरा बोलत असल्यास शांतपणे न अडवता ऐकून घ्या, कदाचित चुकीचे बोलतही असेल.
२) त्याच्या मताशी सहमत नसाल तर शांतपणे पटवून द्या व पूर्ण बोलणे झाल्यावर बोला. जर का मुद्दा मतभेदाचा असेल तर.
३) नाराजी व्यक्त करताना लागेल असे बोलू नये. आवाजात मृदुताच हवी, शब्द योग्य असावेत. एकदा सुटलेला बाण परत घेता येत नाही, तसे शब्द असतात. व्यक्तींबद्दल आकस नको. नाराजी कामाबद्दल आहे, तेव्हा व्यक्तिदोष न पाहता कामातील दोष पहावा.
४) त्यांच्या मर्मावर बोट ठेवू नका. मतभेद व्यक्त कराल, भांडण करू नको. शांतपणे मुद्याचं बोला. तुमच्या मर्यादेत काय सुधारणा करायची याचा आवाका लक्षात घ्या.
५) दोन माणसे बोलत असतात. एखादा तिसरा माणूस मध्येच बोलतो व मग पहिला चूप बसा, मग बघू, असे बोलतात. असे न करता तुमचा क्रम येईल तेव्हा बोला, सौम्यपणे सांगा. चेहरा व हातवारे भावना व्यक्त करतात व वातावरण तापवतात. आवाजाचा टोनही भांडायला मदत करतो, तेव्हा वेळीच आदराने शांतपणे प्रत्येकाचे ऐकणं, संघर्षावर हा रामबाण इलाज आहे.
६) भावनांवर नियंत्रण ठेवा. नियंत्रण सुटलं की, माणसाला समोरच्याचं बोलणं कानावर पडतं पण समजत नाही. संधी मिळत नाही, तेव्हा आपली किंमत नाही असे एखाद्याला वाटते. याचा राग येऊन उलट बोलले जाते किंवा काहीच बोलले जात नाही म्हणून ऐकून घ्या.
७) शांतपणे ऐकलं की, आपुलकी निर्माण होते, सहकार्य वाढीस लागते. न बोलताही भावना समजतात. संत रामदासांनी म्हटलं
आहे –
ऐकल्याने होत आहे रे आधी ऐकलेचि पाहिजे.
ऐकाल तर सुखी व्हाल.
अपयश आलं तरी न घाबरता मार्गक्रमण करा. यश तुमचेच.
कल्पना पांडे
रम्य ते बालपण

तुम्हाले सांगते राजेहो, लाह्यानपनच्या आठुनी कहीभी आठुल्या ना तं जीव कसा हरकून जाते!
या खेळाईच्या नादात शाळेचंभी भान नाही राहे. रडतकुथत कसंतरी शाळेत जावंं लागे. शाळेत गुरुजीले जर का समजलं का या पोट्ट्यानं अभ्यास नाही केला, तर असं सपासप रुळानं झोडपून काढत का, इचारायची सोयच नाही! पन् काही होवो, शाळा सुटली रे सुटली तर पुना खेळाईशिवाय दुसरं काहीच करो नाही! गावभर भटकनं काय, चिचा, बोरं, पेरू, आंबे झाडावर चढूनाशन भकाभक खानं काय, भल्लीच मजा करो आम्ही! सुट्टीच्या दिवशी आमराईतल्या झाडाईवर डाबडुबलीचा खेळ तं असा रंगे का जेवाय-खावायचं भानच नाही राहे!थ्या झाडाईवरच्या शिवाशिवीच्या खेळात जर का कोनी पोट्टं खाली पडलं अन् त्याले रगत आलं तर घरी काही सांगायची सोयच नव्हती.जर का घरच्याईले समजलं तर आणखीन त्याईच्या हातचा मार खावा लागे!
नदीवर पोहायले जावो ना आम्ही तं भल्लीच मजा ये! काढले सारे आंगातले कपडे का मारल्या नदीत भकाभक उड्या! काही काही पोट्टे तर भलकसेच कुचीन! चिपचाप नदीच्या बाहेर येऊन कोणाचे तरी कपडेच लपवून ठेवत! मंग त्या पोट्ट्याले घरी जायची भल्ली लाज वाटे.
होळीच्या दिवशी तर इचारायचीच सोय नाही! भल्लाच चेव चढे आम्हाले! होळीसाठी लाकडं जमा करनं घरोघरी जाऊन! नाही देल्ले तर आना चोरून! शेणाच्या चाकोल्या पोट्टे आपापल्या घरी करून वाळवून ठेवत. पुरणाचा नैवेद्य तर राहेच. एकदा का नैवेद्य होळीले देल्ला अन् होळी पेटवली तर मग लागे पोट्टे बोंबा मारायले! रातभर धिंगाणा राहे. काहीबाही खेळ खेळो,लाकडं चोरून आणो.या सार्या खेळात घानमाकडाचा खेळ खेळतानं भल्ली मजा ये. एका जमिनीत गाडलेल्या उभ्या खांबावर कमरीएवढ्या उंचीवर एक आडवं धनुष्याच्या आकाराचं लाकूड फसवून ठेवलेलं राहे. त्याच्या दोन्ही टोकावर पोट्टे बसून गरगर त्याले फिरवून दे. कोणी पडे तर कोणी गनगन फिरवत राहे. मज्जाच मज्जा!
आमच्या लाह्यानपनी भीक मांगायले एक कैकाडीन ये. ते आली तर तिले पाहून आम्हाले भाईच भेव लागे! होतीच राजेहो तशी त्ये! भुतावानी! तिचे ते लट्टारे बट्टारे केसं, लाल लाल डोळे, पांढरे-काळे बटबटीत दात, एखाद्या डाकिणीसारखीच दिसे ते!कई जल्मात तिनं आंघोळ नसन केली!
आमच्या दाराशी ते आली का जोेरानं ओरडून म्हणे, ‘‘देवो माय, भाकर तुकडा, देवो माय, माही माय देते, भाकर देते, देवो माय’’ असं म्हणून नाचू लागे. आम्ही तिले खिजवून गाणं म्हणाले मांगं लागो! तवा ते भसाड्या आवाजात तिचं नेहमीचं गाणं म्हणे,‘‘सय्यरपुरामंदी गहू-तांदूळ भारी कू, वयकू नाही आला टोपीवाल्याचा मुलूकू॥ अन् नाचू लागे. आमाले मजा वाटे. आम्हाले सागरगोट्याभी कही कही ते दे! गुंजाभी.
आम्ही मोर्शीले राहो तव्हा आमच्याच शेजारी देशपांडे राहे! भारीच शिरीमंत होते ते. गडीमानसं, जमीनजुमला, गाईम्हशी, गाडीघोडे सारं काही होतं त्याईच्याकडं. भला मोठा वाडा होता त्याईचा. त्याईचे चार भाऊ अन् आमचे चौघे भाऊ एकमेकांईचे मस्त दोस्त होते! त्याईच्यातला सर्वात लाह्यना थो माहा दोस्त! त्याले मी नानाबेंड्या म्हनो. काऊन तर त्याच्या व्हटाले बेंड व्हतं म्हणून. त्याच्या मोठ्या भावन्लेभी अशाच जोडनावाने ओळखे. मोठ्याले बाबू उंट, दुसरा अण्णा घोडा, मंग भैया बरणी! अशीच परथा व्हती तवा हाक मारायची आमच्या आपसात.
आताआत्ताची गोष्ट हाये, मी पाहुनचाराले माह्या साळ्याकडे गेलो होतो त् तिथं कसा हा नानाबेंड्या मले भेटला. माह्या साळ्याचा अन् त्याचा दोस्ताना! दोघंबी शिरीमंत अन् कलबात जाये खेळाले! तिथंच मले तो भेटला. तिथल्या कॉलेजात तो म्हणे प्रिन्सीपाल व्हता. भेटल्याबरोबर माह्या तोंडून आपसुखच जोरदार ‘नाना बेंड्या का रे तू?’ असंच निंघालं. तोभी हरकला अन् गळामिठी पडला. त्यानं मले घरी बलावून त्याच्या लक्षुमीच्या हातचं पुरण-वरणाचं मस्त जेवाले दिलं? त्याची लक्षुमी त् आमच्या लाह्यानपन्च्या आठुनी ऐकू ऐकू हासू-हासू लोटपोट झाली! त्याच्या घरी सख्या नावाचा गडी होता. हा नाना लाह्यानपनी भल्लाच इबलीस होता. कोण्णाले ऐकेच नाये! तवा या सख्या गड्यानं आपले दात वासवून दाखवले का, हा आपल्या मायच्या नावाने ओरडून म्हणे, ‘नानी पाय नं वं, सख्या भेववते नं वं! बैेलाचे दात दाखवते नं वं!’ नानाची लक्षुमी भल्ली हासे!
एक तं तुम्हाले सांगायचं राहूनच गेलं ना! माहा जनम बराबर कृष्णाच्या जनम्दिवसीच झालता! वान नाही तरी गुन मात्र थोडे थोडे आपसुखच आलते!माझ्या मैतरणी लाह्यानपनापासून राहेच.अशीच एक लाह्यानपनची माही मैतरीण होती!तिचं नाव भी कसं राधाच राहावं! आम्ही दोघं खूप खेळो, अभ्यास करो, गोष्टी सांगत बसो अन् कधी कधी एकमेकाच्या खोड्याभी काढो. एकदा त् तिनं मजाच केली. तिले माहीत होतं की मले लिमलेटच्या गोळ्या भलत्याच आवडे.तवा आतासारखी चॉकलेट थोडीच भेटे. त्याच्याच्यानं या लिमलेटच्या गोळ्याईचंच आम्हाले कवतुक वाटे! तर ते राधा मले काय म्हने ‘बाबू, तुले लिमलेटची गोळी आवडते ना? पाहिजे असन् तर तिले जिंकून घ्यावी लागन्. ह्ये पाय, या लिमलेटच्या गोळीले मधामधी दोरा बांधला आहे. त्या दोराचं एक टोक तू धर आपल्या तोंडात अन् दुसरं टोक मी धरते आपल्या तोंडात. जो अगुदर तोंडात दोरा गुंडाळत लिमलेटच्या गोळीपाशी येईन त्यालेे ते मिळेल.’मंग काय आम्ही गोळी जितायच्या चेवानं जे भिडलो दोरा तोंडात धरून गुंडाळायला तर आम्हाले समजलंच नाही आम्ही दोघंही कसे एकदमच त्या गोळीपाशी येऊन पोहोचलो ते! अन् कशी त्याच वक्ती माही माय तिथं यायलाभी एकच गाठ पडली.मंग काय इचारता? चांगलीच भादरल्या गेली आमची.
आता ते लाह्यानपन्चे दिस आठुले का वाटते देवानं आपल्याले नेहमीसाठीच लाहान काहून का नसन् ठेवलं? आता सोताचे घर, बगीचा, मुलं, सुना, सारं काही आहे. एकाद्या वक्ती घरच्या बगीच्यात बंगईवर बसून त्या आठुनीत मन रमून जाते तवा कशी घरची लक्षुमी मले इचारते, ‘काहूनजी कोनाची आठुन झाली?’मी भानावर येऊन तिले खिजवतो, ‘तुह्या भईनीची?’
अरविंद पांडे
किचन कट्टा

गृहिणी असो वा नोकरदार स्त्री तिचा बराच वेळ किचनमध्ये जातो. किचनमध्ये काम करायचं म्हणजे किचन स्लॅब अर्थातच किचन ओट्याजवळ उभं राहूनचकरावं लागतं.किचनमध्ये ओटा अतिशय महत्त्वाचा असतो. पूर्वी स्वयंपाकघरात ‘चौका’ असायचा. म्हणजे स्वयंपाकघरात एक चौकोनी भाग उंच बांधलेला असायचा.त्यावर गॅस अथवा चूल ठेवून,शेजारी खालीच बसून गृहिणी स्वयंपाक करायची. आता मात्र सर्वच घरात किचन ओटा अत्यावश्यकच बनला आहे. घर बनवताना इतर सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. मात्र, बर्याचदा ओटा हा दुर्लक्षित राहतो. मात्र, पुढे चुकीच्या बांधणीमुळे त्रास होऊ लागतो. म्हणूनच किचन-ओटा बनवताना काही गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवलं पाहिजे.
किचनमध्ये स्वयंपाक बनवताना पायाखाली पाट अथवा स्टूल घ्यावा. तुमची उंची अधिक आहे आणि ओट्याची उंची कमी आहे, तो भाग तुमच्या कंबरेच्या खाली येत असेल तर स्वयंपाक करताना बराच ताण सहन करावा लागतो. बर्याच महिलांना अशा त्रासाचा सामना नित्याने करावा लागतो. ओटा पुन्हा तोडून नवा तयार करण्यापेक्षा आहे तेच चालू द्या, असा कल बर्याच महिलांचा असतो. मात्र, असं न करता वेळीच ओटा आपल्या उंचीप्रमाणे बनवून घ्यावा. काही वर्षांपूर्वी ओटा ३८ इंचांचा असायचा. मात्र, आता सर्वसाधारपणे ३३ इंचांचा असतो. अलीकडे स्लॅब न तोडताही त्याची उंची कमी जास्त करता येते.
ओटा बनवताना सर्वात प्रथम पोळ्या करताना योग्य प्रकारे उभं राहता येतं का, हे पाहावं. आपल्या उंचीनुसार ओट्याची उंची ठरवावी. ओट्याची जागा अशी असावी, जिथून इतर वस्तू सहजपणे हाताशी येतील, अर्थात जवळ पडतील. ओट्यावर जिथे गॅस ठेवणार आहात त्याच्या आजूबाजूला कोणतीही विजेची जोडणी नसावी. ओव्हन, मिक्सरची जागा थोडी लांबच ठेवावी.ओट्यावर ठेवण्यात येणारा दगड शक्यतो काळाच असावा. म्हणजे डाग पडले तरी दिसत नाहीत.अलीकडे यात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मार्बल ग्रॅनाईटमध्ये विविध रंग उपलब्ध आहेत. त्यातही गडद शेड निवडावे. ग्रीन, ग्रे हे रंगही पर्याय म्हणून वापरता येतील. तुम्ही उजव्या अथवा डाव्या कोणत्या हाताने काम करता याचाही विचार ओट्याची आणि इतर सामानाची रचना करताना करावा. जेणेकरून वस्तू हाताळणं सोपं जाईल.
सध्या ‘ई-साइज’ किचनचा ट्रेंड बदलून ‘आयलँड साइज’चा ट्रेंड आला आहे. ‘ई-साइजमध्ये’ किचनच्या एकाच भागात सर्व काम करायचं आणि त्यानुसार रचना करायची. त्यामुळे किचनचा दुसरा भाग रिकामाच राहत असे. ती जागा वापरात येत नसे. ‘आयलँड’मध्ये किचनच्या प्रत्येक जागेचा मोठ्या कल्पकतेनं वापर केला जातो.सर्व भागात सामानाचं नियोजन करता येतं.
ओटा बनवल्यानंतर गॅसच्या वरच्या बाजूने शक्यतो कॅबिनेट्स बनवू नये.एक तर ओट्याच्या रुंदीमुळे तिथून वस्तू काढणं अवघड जातं. त्याचबरोबर फोडणीच्या धुरामुळे कॅबिनेट्स सतत खराब होत राहतात. त्यापेक्षा ओट्याची रुंदी सोडून उजव्या आणि डाव्या बाजूने वॉल कॅबिनेट करणं उत्तम पर्याय आहे. वास्तुशास्त्रानुसार ओट्याची दिशा शक्यतो पूर्व किंवा दक्षिण पूर्व असावी.गॅस तरी किमान दक्षिण पूर्व दिशेने ठेवावा आणि सिंक अथवा वॉश बेसिन उत्तर पूर्व भागात असावं. अर्थात या टिप्स ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे,अशांसाठी आहेत. इतरांनी मात्र आपल्या सोयीनुसार रचना बनवावी.
हल्ली ‘एल’ आकाराचा ओटा बनवता येतो. मुख्य ओटा पूर्व अथवा दक्षिण पूर्व दिशेने असला पाहिजे.म्हणजे दक्षिण भिंतीला ओट्याचा दुसरा भाग असावा.त्यावर मायक्रो-ओव्हन,मिक्सर इत्यादी वस्तू ठेवाव्यात. ओट्याच्या वर छतापर्यंत टाईल्स लावून घ्याव्यात म्हणजे साफ करण सोयीचं जातं. हल्ली ‘सी-शेप’ ओट्याचीही चलती आहे. त्यासाठी अर्ध्या अंतरावर लाकडी अथवा फायबरचा प्लॅटफॉर्म बनवला जातो. तो फिट करण्यासाठी स्टीलचे बीम, रॉड, वापरतात. या प्लॅटफॉर्मचा वापर चहा, नाश्ता करण्यासाठी केला जातो. प्लॅटफॉर्मच्या वरच्या बाजूने स्टोअरेजही केलं जातं.यामुळे किचनला आधुनिक टच येतो. प्लॅटफॉर्मजवळ बसण्यासाठी, फिरते स्टूल, फोल्डिंग चेअरचा वापर करता येतो. किचन-ओट्याचे बरेचसे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मॉड्युलर किचन बनवलं तर ओट्याची जागाही तुम्ही पाहिजे तशी बदलू शकता. थोडक्यात काय, तर कोणताही ओटा बनवायचा असला तरी गृहिणीची सोय सर्वात महत्त्वाची असते.
कोकणायन

दोन महिन्यांपासून ट्रिपला कुठं जायचं याचा घोळ चालू होता. कुणी काश्मीर म्हणायचं तर कुणी केरळ! थोडे वादविवाद झाले.शेवटकोकणातील आंबोलीला जायचं ठरलं. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे जायच्या तयारीला लागले. दोन वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचे सारे सामील झाले. सगळ्यांनी नागपूर स्टेशनवर भेटायचं ठरलं. वेळ होताच गाडी मुंबईकडे धाऊ लागली. रात्रीचे नऊ वाजले. जेवणाची वेळ झाली. प्रत्येकानं आपापले डबे उघडले. गाडी सारखी धावतच होती. शेवटी धाऊन किती धावणार? तिचेही सांधे दुखणारच! मध्येच रुळाचं काम सुरू होतं ते यानंच. गाडी मध्ये मध्ये थांबून विश्रांती घेत होती. अखेर ठाणे आलं. सगळे जण पांगले. कुणी बहिणीकडे, तर कुणी कुठे असे गेले. आम्ही मात्र ठाण्यालाच ठाण मांडलं. तेवढ्यात फोन खणखणला. आम्ही सगळे दहिसर, बोरिवलीवाले ठाण्याला सकाळी आठला पोहोचतोय् तयार रहा असं बजावण्यात आलं.वरसोवावाले कुठे सामील होणार ही विचारणा करण्यात आली. दुसर्या दिवशी सकाळचे आठ वाजून गेले, तरी बोरीवलीवाल्यांचा पत्ता नाही. पुुढं दहा वाजून गेल्यावर मात्र ठाणेकर कंटाळले. त्यांच्या कपाळावर आठ्या दिसायला लागल्या. वरसोवावाले पनवेलला पोहोचून बाकीच्यांची वाट बघत ताटकळत होते. एकदाचे येणारे ते आले. आजूबाजूला जणू काय ईश्वरानं हिरवेकंच मखमली गालिचे पसरलेले, त्यातून कुंकवाच्या रंगाच्या नागमोडी पायवाटा डोंगरमाथ्यावर चढत गेलेल्या. मध्ये मध्ये लहान-मोठे निर्झर खळाळत असलेले.
मध्येच कुणीतरी म्हणालं, ‘‘ए मराठी सिनेमाची कॅसेट लाव ना! मग सगळ्यांचे डोळे टीव्हीकडे लागले, पण त्यात चित्र न दिसता फक्त गाणंच ऐकायला लागलं. मग मध्येच एकीचा आवाज आला, ‘हम है बंबईवाले,’ सगळे हसले. नंतर कसाबसा सिनेमा चालू झाला. मग मात्र एकदम शांतता पसरली.’’
रात्रीचे दहा वाजून गेले आणि पोटात कावळे कोकलत होते. मग बस एका हॉटेलशी थांबली. जेवण करून प्रत्येकच जण आपापल्यापरीनं पेंगू लागला. बाहेर निसर्गही झोपलेला. त्यालाही बहुधा अंगाईनं झोप लागली असावी. अखेर आंबोली आली. खाली उतरताच सगळ्यांच्या तोंडून उद्गार निघाले, ‘‘आ हा हा! काय थंडगार हवा! जणू निसर्गानं सभोवताल सर्वत्र ए.सी. लावलेला! झोपायला धुक्याच्या गाद्या पसरलेल्या! थकले भागले सगळे जमिनीला पाठ लागताच झोपले,सकाळी लवकर उठण्याच्या चिंतेसह!’’
सकाळी सहालाच आधी उठलेल्यांचे आवाज यायला लागले. आपापलं सामान घेऊन उगवत्या नारायणाच्या साक्षीनं हॉलमध्ये जमले. चहा, कॉफी आटोपून सगळे बसमध्ये स्थिरावले.बस हिरण्यकेशी मंदिराकडे धावू लागली. देऊळ डोंगरातल्या एका भुयारात आहे. शंकराच्या मूर्तीच्या आजूबाजूला त्याचा पुत्र गणपती, नंतर लक्ष्मी, सरस्वती वगैरे मूर्ती आहेत. कुणीतरी हिरण्यकेशी नदीचा उगम विचारला तेव्हा महाराजानं भुयाराकडे सरकून तो दाखवला.तिथं पाण्याची छोटी धार वाहताना दिसत होती. पुढे सगळेजण सनसेट पॉईंट व सूर्यास्त बघायला निघाले. सगळ्या दर्या-खोर्या पाहून झालेल्या. शेवटी बायकांचा मोर्चा सूर्यास्ताकडे वळला. सूर्य हळूहळू खाली जात होता.तोही दिवसभर पृथ्वीची सेवा करून श्रमांनी लालबुंद झालेला. बायकांचा मोर्चा आपल्याकडे येत असलेला पाहून अखेर त्या नारायणानं डोंगराआड पलायन केलं. संध्याकाळ होऊन अंधार वाढू लागला. रस्त्यांवरचे दिवे लागले तसा सगळा मोर्चा माघारी फिरला. उलट्या प्रवासानं बस पुन्हा मुक्कामी परतली. रात्रीचे अकरा वाजलेले. त्यानंतर जेवणावळ आटोपली. तेवढ्यात घोषणा झाली की, उद्या गोव्याला जायचं आहे. ‘गोवा’शब्द ऐकताच सगळ्यांचे कान टवकारले. बायकांना काजूचं आकर्षण, तर पुरुषांना काजू-फेणीचं!
सगळेजण सकाळी सात वाजताच चहा-कॉफी घेऊन तयार झालेले. प्रवास सुरू झाला. प्रवासात मध्येमध्ये आंबे, फणस आणि रानंब्याची झाडं लागत होती. सारी झुल्यावर बसल्यागत वार्यानं झुलत होती. मध्येच एका जागी थोडावेळ बस थांबवली गेली. बायकांना मोह आवरला नाही. गोवा जसजसा जवळ येऊ लागला तसा पोरांचा गलका वाढू लागला. सारे किती छान! किती छान! म्हणू लागले.
गोव्यात शिरताच आरशासारखे चकाचक रस्ते, नीटस् चौक, मार्गावरचे पुतळे बघताच ‘गोवा आला, गोवा आला’ ही पोरांची ओरड सुरू झाली. बस प्रथम सेंट फ्रान्सिस चर्चसमोर थांबली. पहिल्या भागातच फादरची बॉडी ठेवलेली होती. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. थोडीफार खरेदी झाल्यावर आपला प्रवास सुरू झाला. बस मंगेशीच्या देवळाकडे धावू लागली.देऊळ येताच प्रत्येकीनं आपापल्या श्रद्धेप्रमाणे पूजा केली. चलायची पुकार होताच सगळे बसमध्ये बसले. बस बीचकडे निघाली. फेसाळलेल्या लाटांवर जणू जलदेवता आल्याचा आभास देणारा! वर आकाशात कापूस पिंजून ठेवल्यागत ढग, खाली चाळून ठेवल्यागत वाळू, बारीक आणि स्वच्छ. अंधाराची चाहूल लागू लागली होती. सूर्याचा कधी ढगाआड तर कधी बाहेर असा लपंडाव सुरू होता. वारं जोरात सुटलं होतं. पक्षी आपल्या घरट्यांकडे झेपावत होते.सारं बघून मला कविताओळी आठवल्या-
‘वृक्ष डोलतो, फुले हसती
विहंग तरूवर नाचती…’
हळूहळू सगळा बीच रिकामा झाला आणि आमची बस आंबोळीकडे परतू लागली. हॉटेलवर पोचायला रात्रीचे बारा वाजले. सगळे फार थकलेले, दोन घास पोटात ढकलून आपापल्या जागी जाऊन निवांत झोपले. सकाळी सिंधुदुर्गला जायचं होतं.
नित्याप्रमाणे सगळी तयारी करून सगळे तळमजल्यावर उतरले. सकाळच्या साताला ब्रेकफास्ट झालेला.अखेर सगळे बसमध्ये चढले आणि सिंधुदुर्गचा प्रवास सुरू झाला. गाडी किल्ल्याच्या दिशेनं धावू लागली. तोवर सूर्य तळपत माथ्यावर आला होता. जिकडे-तिकडे गर्द निळं पाणी. लॉंचमधले कुणी बाजूच्या पाण्यात हात घालून ते इतरांच्या अंगावर उडवत होते. पाण्याच्या लाटा परस्परांवर आदळत असल्यानं पाण्यावर केसाचे तरंग येत होते.
लॉंच किल्ल्याशी येऊन थडकली. आम्ही सगळे उतरलो. बरोबर गाईड घेतला होता. तो पाच मिनिटागणिक थांबून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होता. ‘हे शिवाजीचं मंदिर, त्याचा धाकटा मुलगा राजाराम यानं बांधलेलं. ही बावडी सहाशे वर्षांपूर्वी बांधलेली. येथूनच भुयाराला सुरुवात झाली. ती थेट जाते ते मुरूड-जंजिरापर्यंत. हा किल्ला अजिंक्य आहे. आजूबाजूला प्रवाळाची वनस्पती आहे. येथून सगळ्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर दिसतो. सर्व मंडळी किल्ल्यावर चढली. मी पण चढले. सगळ्यांच्या मनात पाल चुकचुकली, ही हार्टपेशंट उद्या हिला काही झालं तर आम्हा सगळ्यांवर शेकणार!मी मात्र देवाचं नाव घेऊन किल्ला सर केला. दुपारी चार वाजता आम्हाला माघारी नेणारी लॉंच होती. ती लगेच सुटणार असल्यानं आम्ही लगबगीनं खाली उतरलो व लॉंचकडे पळालो आणि पटापट आत जागा धरल्या. सुरू होऊन केवळ वीस मिनिटातच ती धक्क्याला लागली. काळोख पडायला लागला होता. अंधारापूर्वी तारकळी बीचवर पोहोचायचं होतं. तारकळीला बराच लांबलचक म्हणजे बावीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला.एवढी लांब निसर्गरम्य खाडी! स्वच्छ आणि अथांग काचेसारखं निर्मळ पाणी. जवळच कर्ली नदीचं मुख. ती समुद्राला मिळते तिथंच हे तारकली गाव वसलेलं. संगमापुढे समुद्रात रंगीबेरंगी मासे तसेच डॉल्फिन आढळतात म्हणे! या भागाला मिनी गोवा म्हटलं जातं. गोवा सरकार आता पर्यटकांसाठी काचेचा तळ असलेल्या बोटी बनवणार असल्याचं ऐकलं. सिंधूदुर्ग जिल्ह्यात बघण्यासारखी खूपशी ठिकाणं आहेत. आंबोळी, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आदी. आम्ही परतेस्तोवर काळोख पडायला आलेला. हॉटेलला पोहोचेस्तोवर रात्रीचे अकरा झालेले. बस ‘जानकी’ नावाच्या हॉटेलसमोर थांबली. सकाळपासून खाण्यापिण्याचं काही सोबत नसल्याने सगळे खाण्यात गुंतले. कलकलाटात कुणाचं कुणाला कळेना. मात्र, सगळे जेवणानं तृप्त झाले आणि ढेकर देत बसमध्ये चढले. बस बिचारी सगळ्यांची वाट बघत होती. पॅसेंजर आले पण तिला मालक दिसेना. अखेर ड्रायव्हर आला आणि ती मुक्कामाकडे धाऊ लागली. धावून धावून किती धावणार.तिलाही भूक लागलेली म्हणून ती पेट्रोलपंपावर थांबली. आम्ही मुक्कामी पोहोचलो आणि प्रत्येक जण रात्रीच्या कुशीत विसावला.
आजचा दिवस विश्रांतीसाठी राखलेला. तरी सकाळी थोडा फेरफटका झालाच. नंतर मात्र विश्रांती. दुपारी चारला पुकार झाली ‘फार्मला जायला तयार व्हा’ सगळे गडबडीनं उठून तयार होऊन बसमध्ये बसले. प्रवास सुरू झाला. रस्त्यानं आमराई दिसताच बस थांबवली गेली. तिथल्या एका झाडावरच्या शेंड्यावरून कोकिळा सूर लावत होती. बहुधा तिचं लॉजिंग, बोर्डिंग त्याच जागी असणार. तिच्या स्वरातून खात्रीनं ‘कुहू कुहू बोले रे कोयलिया’ उमटलं असणार! म्हणूनच त्यावर आमच्यातून ‘वाहवा! क्या बात है!’ ही दाद आली. माणसाची चाहूल लागताच कोकिळा उडून पसार झाली. पाऊस येण्याचा रंग दिसत होता. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटलेलं. आभाळ तांबडंलाल होऊन संधीप्रकाश पसलेला. छोट्या छोट्या पावसाळी ढगांचे पुंजके बालकाप्रमाणे दुडदुड धावल्यागत खेळत होते. दुसर्या दिवशी मुंबईला परतायचं म्हणून आम्ही विसावलो.
नित्याप्रमाणे सकाळीच तयार होऊन बसमध्ये बसलो. रत्नागिरीच्या मार्गावर बस थांबवण्यात आली. आंब्याचं मोठं मार्केट होतं. भाव स्वस्त असल्यानं कुणी दोन, तर कुणी चार डझन अशी खरेदी केली. मात्र खात्रीनं आंब्यात मिसळ होती. चांगला भाव मिळाल्यानं आंबेवाला खूष आणि स्वस्त मिळाले म्हणून आम्हीही खूष! बस मुंबईकडे निघाली. मुंबईला पोहोचेस्तोवर रात्रीचे बारा झालेले.
नागपूरकरांना मेजवानी द्यायचं ठरलं. मुख्य पदार्थ आंब्याचा रस! रस काढताना लक्षात आलं की, डझनामागं २-३ आंबे सडके आहेत. मग एकमेकींना फोन सुरू झाले. सगळ्यांकडे तेच होतं. मेल्या आंबेवाल्यानं सगळ्यांना हातोहात फसवलेलं. म्हणजे पैसे पाण्यात गेले. अखेर मेजवानी पार पडली. नागपूरकरांची परतीची गाडी रात्री अकराला होती. सगळ्यांनी स्टेशनवर भेटायचं ठरलं. मुंबईकरांनी नागपूरकरांना ‘हॅपी जर्नी’ म्हणून निरोप दिला, तर नागपूरकरांनी म्हटलं-
‘आम्ही जातो अमुच्या गावा
अमुचा रामराम घ्यावा…’
इंदुमती मनोहर सप्रे





